ब्रिटनचे एफ -35 बी फायटर जेट हलले
22 दिवसांनंतरही तांत्रिक दुरुस्ती करण्यात अपयश
वृत्तसंस्था/ तिरुवनंतपुरम
गेल्या 22 दिवसांपासून तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे असलेले ब्रिटिश रॉयल नेव्हीचे हाय-टेक लढाऊ विमान एफ-35बी लाइटनिंग अखेर रविवारी हलवण्यात आले. सुमारे 920 कोटी रुपये किमतीचे हे युद्ध विमान रविवारी धावपट्टीवरून काढून एमआरओ (देखभाल आणि दुरुस्ती विभाग) हँगरमध्ये हलवण्यात आले. नादुरुस्त झालेले हे विमान देशात नेण्यासाठी ब्रिटनमधील अभियंत्यांची एक विशेष टीम केरळमध्ये पोहोचली आहे. त्यांच्याकडून या विमानाचे भाग सुटे करण्याचे व दुरुस्तीचे काम सुरू आहे. विमानतळ अधिकारी आणि पोलिसांच्या संरक्षणाखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू आहे.
ब्रिटनचे आधुनिक लढाऊ विमान एफ-35बी लाइटनिंगचे तांत्रिक बिघाडामुळे 14 जून रोजी तिरुवनंतपुरम येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. तेव्हापासून ते धावपट्टीच्या एका बाजूला उभे होते. एफ-35बी हे एक गुप्त आणि उच्च-सुरक्षा श्रेणीचे विमान असल्याने त्याच्याभोवती कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. भारताने दिलेल्या सुविधा आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ब्रिटनने ‘आम्ही संपूर्ण प्रक्रियेत भारत सरकार, विमानतळ प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनासोबत जवळून काम करत आहोत’ असे म्हटले आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून एफ-35बी खुल्या धावपट्टीवर उभे असल्यामुळे सुरक्षा आणि गोपनीयतेचे आव्हान निर्माण झाले होते. आता ते विमानतळाच्या देखभाल व दुरुस्ती कक्षात नेण्यात आले आहे. तांत्रिक कामांसाठी डिझाइन केलेले एक विशेष क्षेत्र आहे. येथे या विमानाचे भाग वेगवेगळे करून ते ब्रिटनला नेले जाणार असल्याचे समजते.
एफ-35बी हे लढाऊ विमान जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक आहे. त्यात उभे टेक-ऑफ, गुप्त तंत्रज्ञान, मल्टी-सेन्सर फ्यूजन आणि हाय-स्पीड नेटवर्किंगसारखी वैशिष्ट्यो आहेत. हे ब्रिटिश रॉयल नेव्हीचे ऑपरेशनल फ्रंटलाइन जेट असून सामान्यत: युद्धनौकांमधून चालवले जाते.
Comments are closed.