‘मिशन एल्फिन्स्टन’ फत्ते होताच फटाक्यांची आतषबाजी, चार महिन्यांत उभारणार डबल डेकर पूल
ब्रिटिशकालीन ‘एल्फिन्स्टन पूल’ शनिवारी रात्री जमीनदोस्त करण्यात आला. मध्य रेल्वे आणि ‘महारेल’च्या यंत्रणांनी संपूर्ण रात्रभर अविश्रांत काम करीत जुन्या पुलाचे महाकाय गर्डर्स हटवले. पहाटेच्या सुमारास ‘मिशन एल्फिन्स्टन’ फत्ते करण्यात आले आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून यशस्वी कामगिरीचा जल्लोष साजरा करण्यात आला. या पुलाच्या जागी ‘महारेल’द्वारे पुढील चार महिन्यांत नवीन डबलडेकर पूल उभारण्यात येणार आहे.
वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठी एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम करण्यात आले. विविध कारणांमुळे सात महिने रेंगाळलेले पाडकाम शनिवारी रात्री पूर्ण करण्यात आले. यासाठी मध्य रेल्वे मार्गावर साडेसात तासांचा ‘महाब्लॉक’ घेण्यात आला होता. नियोजनानुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळावरील गर्डर्स हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. महारेल व मध्य रेल्वेचे जवळपास 100 कामगार, अभियंते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज संपूर्ण रात्रभर कार्यरत राहिली. ओव्हरहेड वायर काही कालावधीसाठी सुरक्षितरित्या हलवून काम करण्यात आले. अंदाजे 37 मीटर लांबीचा पिलर पहाटे 4च्या सुमारास महाकाय व्रेनच्या साहाय्याने हटवण्यात आले. त्यानंतर दुसरा पिलर सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी यशस्वीरित्या हटवून ‘मिशन एल्फिन्स्टन’ फत्ते करण्यात आले. सात महिन्यांनंतर एल्फिन्स्टन पुलाचे संपूर्ण पाडकाम पूर्ण झाल्याचा जल्लोष फटाक्यांच्या आतषबाजीने साजरा करण्यात आला. या वेळी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी कार्यरत राहिलेल्या कामगार आणि अधिकाऱ्यांनी हात उंचावून, एकमेकांना हस्तांदोलन करीत आनंद साजरा केला. पहाटे अनेक स्थानिक नागरिकांनीही पुलाच्या जागेवर भेट दिली आणि तेथील कामगारांच्या परिश्रमाला दाद दिली.
नव्या पुलाचे गर्डर्स लवकरच नोएडातून मुंबईत आणणार
विविध मंजुऱ्या तसेच इतर अडचणींवर मात करीत एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम पूर्ण करण्यात आले. आता नव्या डबलडेकर पुलाच्या कामाला गती देण्याचा निर्धार ‘महारेल’ने केला आहे. रेल्वे मार्गिकेवरील डबलडेकर पूल उभारणीचे काम जुलैपर्यंत पूर्ण केले जाईल. नव्या पुलासाठी आवश्यक असलेले गर्डर नोएडा येथील फॅक्टरीमध्ये तयार झाले आहेत. तेथून लवकरच ते मुंबईत आणण्यात येतील, असे ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जैसवाल यांनी सांगितले. नवीन पूल उभारणीला अधिक वेळ लागणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
Comments are closed.