ब्रिटीश नेते केर स्टारर भारतात येतील
पुढच्या आठवड्यात दौरा, महत्वाचे करार होण्याची शक्यता, पंतप्रधान मोदी यांच्याशी ते चर्चा करणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ब्रिटनचे नेते कीर स्टार्मर यांचा भारत दौरा निश्चित झाला आहे. ते पुढच्या आठवड्यात भारतात येणार असून द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांचा हा भारत दौरा आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 8 आणि 9 ऑक्टोबर असे दोन दिवस त्यांचा हा दौरा असून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन भारतात येत आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील धोरणात्मक भागिदारी अधिक दृढ आणि बळकट करणे, हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश असल्याचे प्रतिपादन भारताकडून करण्यात आले आहे. ही भागीदारी अधिक भक्कम बनविण्यासाठी ‘व्हिजन 2035’ नामक मार्गदर्शक घोषणापत्र बनविण्यात आले आहे. ही 10 वर्षांची व्यापक योजना असून द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक हे या योजनेचे महत्वाचे भाग आहेत. त्याचप्रमाणे तंत्रज्ञान आणि संशोधन, संरक्षण आणि सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, आरोग्य, शिक्षण आणि जनसंपर्क अशा विविध मुद्द्यांवर या दौऱ्यात चर्चा होणार आहे.
काही करारही अपेक्षित
स्टार्मर यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान आणि संशोधनासंबंधी, तसेच परस्पर व्यापारासंबंधी काही करारही होण्याची शक्यता आहे. नुकताच भारताने ब्रिटनशी मुक्त व्यापार करार केला आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही देश तंत्रज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठीही उत्सुक आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
9 ऑक्टोबरला मुंबईत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्टार्मर हे दोन्ही नेते 9 ऑक्टोबरला मुंबईत येणार आहेत. मुंबईत त्यांचा भारतातील विविध मोठ्या उद्योगांच्या नेत्यांशी संवाद होणार आहे. ‘भारत-ब्रिटन सर्वंकष आर्थिक आणि व्यापारी करार-2025’ संबंधी या कार्यक्रमात चर्चा केली जाणार आहे. या करारामुळे कोणत्या संधी उद्योजकांना उपलब्ध झाल्या आहेत, याचीही चाचपणी या कार्यक्रमात केली जाणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानंतर…
जुलै 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचा दौरा केला होता. त्याच दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार करण्यात आला होता. आता स्टार्मर यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जाणार आहेत. जुलैतील दौऱ्यात दोन्ही देशांनी संरक्षण विषयक करार केला होता. त्याचा पाठपुरावा या स्टार्मर यांच्या दौऱ्यात केला जाणार आहे.
मुक्त व्पापार कराराचे महत्व
दोन्ही देशांमध्ये झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे परस्पर व्यापाराला चालना मिळणार आहे. 24 जुलैला हा करार करण्यात आला होता. त्यानुसार ब्रिटनने भारतातून त्या देशात आयात केल्या जाणाऱ्या 99 टक्के वस्तूंवर शून्य टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. तर भारताने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या 90 टक्के वस्तूंवरील कर हटविला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिकेशी तणावाची पार्श्वभूमी
अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापारी शुल्क लागू केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये आर्थिक तणावाचे वातावरण आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी करार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण ते प्रयत्नही अद्याप यशस्वी झालेले नाहीत. भारताने अमेरिकेची कृषी उत्पादने आयात करावीत, असा अमेरिकेचा आग्रह आहे. मात्र, भारताने याला नकार दिला आहे. स्टार्मर यांचा हा दौरा या पार्श्वभूमीवर होत असल्याने त्याला विशेष महत्व देण्यात येत आहे.
संबंध दृढ करण्यासाठी…
ड अमेरिकेशी निर्माण झालेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दोरा
ड दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार कराराचा आढावा यावेळी घेतला जाणार
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरीन कीर स्टार्मर भारतात येणार
ड तंत्रज्ञान संशोधन, व्यापार, गुंतवणूक आदी संबंधी महत्वाचे करार शक्य
Comments are closed.