भाजप जिल्हाध्यक्षांच्या भावाला लाच घेताना अटक
भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचे भाऊ कनिष्ठ अभियंता सचिन सुरेश दिनकर याला आज साडेसहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कारवाई होऊ नये म्हणून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी पुढाकार घेत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू होती.
स्मशानभूमी सुशोभीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करून पोर्टलवर अपलोड करण्यासाठी जि.प. बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता सचिन सुरेश दिनकर यास 6,500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून, त्यांनी देहरे गावातील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे काम केले होते. या कामाचे बिल मंजुरीकरिता पाठविण्याचे काम सचिन दिनकर याच्याकडे होते. दि. 11 मार्च रोजी तक्रारदारांनी दिनकर याची भेट घेतली तेव्हा बिल पोर्टलवरून पुढे पाठविण्यासाठी बिलाच्या 2 टक्केप्रमाणे 16,500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. सचिन दिनकर याने 10 हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित 6,500 रुपयांसाठी तगादा लावला होता. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. 23 मार्च रोजी सापळा रचला. तक्रारदारांनी दिनकर यास लाचेची रक्कम देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिनकर यास पंचावर संशय आल्याने त्याने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने सचिन दिनकर यास ताब्यात घेतले. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारुण बेग यांनी ही कारवाई केली.
Comments are closed.