ZIM vs WI: वेस्ट इंडिजने रचला इतिहास! टी-20 वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा रेकॉर्ड थोडक्यात हुकला; झिम्बाब्वेची जोरदार धुलाई!

शिमरॉन हेटमायर (Shimron hetmayar) आणि रॉवमन पॉवेल (Rowman powell) यांच्या वादळी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा स्कोअर उभा केला आहे. सुपर-8 च्या आपल्या पहिल्या सामन्यात, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजने 20 षटकांत 4 बाद 244 धावांचा डोंगर उभा केला. हेटमायर आणि पॉवेलशिवाय शेवटी शरफाने रदरफोर्डनेही अवघ्या 13 चेंडूत नाबाद 31 धावांची फटकेबाजी केली.

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 260 धावांचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. आता या यादीत वेस्ट इंडिज दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयरलँडचा संघ 235 धावांसह आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली होती. ब्रेंडन किंग (9) आणि शाई होप (14) लवकर बाद झाले. शिमरॉन हेटमायरने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. वेस्ट इंडिजसाठी टी-20 विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. त्याने 34 चेंडूत 85 धावा (7 चौकार, 7 षटकार) केल्या. तसेच कर्णधार रॉवमन पॉवेलने 35 चेंडूत 59 धावांची खेळी केली. त्याचबरोबर रोमारियो शेफर्डने 21 धावा (10 चेंडू), जेसन होल्डरने 13 धावा (4 चेंडू) आणि रदरफोर्डने 31 धावांचे योगदान दिले.

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी या डावात एकूण 19 षटकार आणि 16 चौकार मारले. झिम्बाब्वेचे गोलंदाज या मारामुळे पूर्णपणे हतबल दिसले. त्यांचे मुख्य गोलंदाज आणि कर्णधार सिकंदर रझा सर्वात महागडा ठरला; त्याने अवघ्या 3 षटकांत 52 धावा दिल्या.

Comments are closed.