बीएसएफने पाकिस्तान सीमेवर 'ड्रोन स्क्वॉड्रन' तैनात केले

ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षेत मोठा बदल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यांमधून धडा घेत बीएसएफने पहिल्यांदाच पाकिस्तान सीमेवर एक खास ड्रोन स्क्वाड्रन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. ही  स्क्वाड्रन सीमेवर असलेल्या निवडक चौक्यांवर तैनात होईल. यात देखरेख, हेरगिरी आणि हल्ला करणारे ड्रोन सामील असतील, या ड्रोन्सचे संचालन खास स्वरुपात प्रशिक्षित जवान करणार आहेत.

या स्क्वाड्रनला चंदीगड येथील बीएसएफच्या पश्चिम कमांड मुख्यालयातून नियंत्रित केले जाईल. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने हजारो ड्रोन्स भारतात पाठविले होते, ज्यातील एका ड्रोनने जम्मूच्या खारकोला पोस्टवर बॉम्ब पाडविला होता. या हल्ल्यात बीएसएफचे दोन जवान आणि एक सैनिक हुतात्मा झाला होता.

पाकिस्तानकडून झालेला ड्रोन्सचा वापर पाहता बीएसएफ आता स्वत:च्या चौक्यांचे छत आणि भिंतींना मजबूत करत आहे. याचबरोबर सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने सीमेवर अँटी-ड्रोन तंत्रज्ञान वापरण्याची तयारी देखील केली जात आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बीएसएफने पाकिस्तानच्या 118 हून अधिक चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या.

पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 15 दिवसांनी म्हणजेच 7 मे रोजी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अ•dयांना नष्ट केले होते. भारताच्या या कारवाईत अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले होते. यानंतर पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचे सर्व हल्ले भारतीय हवाई सुरक्षा प्रणालीने उधळून लावले होते. तर भारताने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत पाकिस्तानच्या 14 सैन्यतळांचे मोठे नुकसान घडवून आणले होते. यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकत शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला होता.

Comments are closed.