बीएसएफ जवान अजूनही पाकिस्तान कोठडीत आहेत

चार दिवसांपासून सुटका नाही

मंडळ/ फिरोजपूर

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पंजाबमधील फिरोजपूर जिह्यातील भारत-पाकिस्तान सीमेवरून अटक करण्यात आलेला बीएसएफ जवान पी. के. साहू अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात आहे. गेल्या चार दिवसात तीन ध्वज बैठका घेण्यात आल्या. परंतु अद्यापही सदर भारतीय सैनिकाची सुटका होऊ न शकल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहे. आता बीएसएफने पाकिस्तानी सैन्यासोबत पुन्हा एकदा फील्ड कमांडर स्तरावरील ध्वज बैठकीची मागणी केली आहे. ही बैठक लवकरच होण्याची अपेक्षा आहे. बीएसएफच्या महासंचालकांनी केंद्रीय गृहसचिवांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोहोचवली आहे.

पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने 23 एप्रिल रोजी एका बीएसएफ जवानाला अटक केली होती. अटक होऊन 80 तासांहून अधिक काळ लोटल्यानंतरही बीएसएफ जवानाची सुटका झालेली नाही. 23 एप्रिल रोजी दुपारी बीएसएफच्या 182 व्या बटालियनचे कॉन्स्टेबल ड्युटी दरम्यान चुकून पाकिस्तानी सीमेत घुसल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान, पाकिस्तान रेंजर्सनी त्याला पकडले होते.

बीएसएफने जवानाच्या परतीसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले होते. आतापर्यंत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये तीन ध्वज बैठका (फ्लॅग मिटिंग) झाल्या आहेत. पण सदर सैनिकाची अद्याप सुटका झालेली नाही. अटक केलेल्या सैनिकाच्या ठिकाणाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगत पाकिस्तानने सध्या सैनिकाला परत करण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर बीएसएफने भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या सर्व युनिट्सना हाय अलर्टवर ठेवले आहे.

अटकेमुळे बीएसएफ जवानाचे कुटुंब चिंतेत

पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचलेला बीएसएफ जवान हा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. अटक झाल्यापासून सैनिकाचे संपूर्ण कुटुंब खूप चिंतेत आहे. त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाला लवकर परत आणण्याचे आवाहन सरकारकड केले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचंड तणाव असताना ही घटना घडली आहे. आता सैनिकाच्या परतीसाठी पाकिस्तान रेंजर्सवर दबाव आणला जात आहे. ध्वज बैठकींच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

Comments are closed.