फक्त पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना…शेतकरी, कृषीक्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काहीही नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना विविध घोषणा केल्या आहेत. मात्र, यात फक्त घोषणा असून मोठ्या वल्गना आहेत आणि हा फक्त आकड्यांचा खेळ आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनीही अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात पोकळ घोषणा, मोठमोठ्या वल्गना आत्मनिर्भरसारखे शब्द यापलीकडे काहीही नाही, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावर हल्लाबोल केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात पोकळ घोषणा केल्या आहेत. आत्मनिर्भरसारखे मोठेमोठे शब्द त्यात आहेत. यापलीकडे त्यामध्ये काहीही नाही, अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे. खतांच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी बजेटमध्ये काहीही नाही. कृषी क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. देशात कृषीक्षेत्राचे हब बनवण्याऐवजी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब बनवण्याची घोषणा केल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेती आणि शेतकऱ्यांना झुकते माप दिले गेल्याचे भासवण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र शेतीसाठी करण्यात आलेल्या बहुतांशी घोषणा या सुद्धा उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्यांनाच लाभ पोहोचवणाऱ्या असल्याचे मत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या कापसाला रास्त भाव मिळेल यासाठी ठोस तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली असती तर ती खऱ्या अर्थानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरली असती. प्रत्यक्षात मात्र टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचं भलं होणार असल्याचे भासवलं जात असल्याचे नवले म्हणाले. आसाम मध्ये युरिया प्लांट सुरू करून खतांबद्दल विशेषता युरिया बद्दल आत्मनिर्भर होण्याच्या बाबत पाऊल टाकल्याचं जाहीर करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला मात्र गेल्या अनेक वर्ष खतांवरची सबसिडी कमी केली जाते आहे. परिणामी खतांचे भाव आणि शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढून शेती तोट्यात जात आहे. तेलबिया आणि डाळी बद्दल घोषणा करण्यात आली असली तरी मागील अनुभव पाहता, जोपर्यंत तेलबिया व डाळ पिकांना रास्त भावाची हमी मिळत नाही व त्यासाठी सरकारी खरेदी यंत्रणा सक्षम होत नाही तोपर्यंत या घोषणांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कोणताही लाभ होणार नाही. असे अजित नवले म्हणाले.

Comments are closed.