स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला? भारतात पहिला अर्थसंकल्प कधी सादर झाला?
बजेट 2026 नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण या येत्या रविवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारमण यावेळी नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. रविवारी सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण यांचं भाषण सुरु होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचं धोरण, भारतावर लादलेलं 50 टक्के टॅरिफ, सोने आणि चांदीचे वाढलेले दर आणि भारतीय शेअर बाजारातील घसरण या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा असणार आहे.
Budget 2026 : भारतात अर्थसंकल्प सादर करण्यास कधीपासून सुरुवात?
भारतात ब्रिटीश काळात अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली होती. जगभरात अर्थसंकल्प सादर करण्याची सुरुवात ब्रिटनमध्ये झाली. भारतात पहिल्यांदा अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 सादर करण्यात आला होता. तो अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. अर्थसंकल्पात सरकार वर्षभरातील उत्पन्न आणि खर्चाचा लेखा जोखा मांडतं.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला?
ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प 1947 मध्ये सादर करण्यात आला होता. हा अर्थसंकल्प तत्कालीन वित्तमंत्री आर के शनमुखम चेट्टी यांनी मांडला होता. शनमुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 ला देशाचा पहिला अर्थसंकल्प मांडला. शनमुखम चेट्टी यांचा जन्म 1892 मध्ये झाला होता. ते वकील आणि अर्थतज्ज्ञ होते.
बजेट शब्द कोठून आला?
Budget या शब्दाची अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी जोरदार चर्चा असते. Budget हा शब्द फ्रेंच भाषेच्या लॅटिन शब्द बुल्गापासून आला आहे. याचा अर्थ चामड्याची पिशवी असा होता. बुल्गापासून फ्रेंच भाषेत तो शब्द बोऊगेट झाला. इंग्रजी भाषेत त्याला बोगेट म्हटलं जाऊ लागलं. नंतर बजेट शब्द प्रचलित झाला.
1 फेब्रुवारीला केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण या नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. 2026-27 चा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सीतारमण पी. चिदंबरम यांच्या 9 अर्थ संकल्प सादर करण्याच्या विक्रमासोबत बरोबरी करतील. प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. मोरारजी देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प यापूर्वी 28 फेब्रुवारीला सादर केला जायचा. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात यामध्ये बदल करण्यात आला आणि अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीपासून सादर करण्यात येऊ लागला. अरुण जेटली अर्थमंत्री असताना 28 फेब्रुवारी ऐवजी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाऊ लागला. निर्मला सीतारमण यंदा देशाचा 88 वा अर्थसंकल्प सादर करतील. निर्मला सीतारमण आणि केंद्र सरकार यावेळी अर्थसंकल्पातून देशातील नागरिकांना काय दिलासा देतात हे पाहावं लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.