BLOG : मराठा बंधू आणि भगिनींना खुले पत्र…

ओ अक्षर, m मराठा (Maratha) आहे म्हणून लिहिलेलं नसून एक सच्चा शिवभक्त म्हणून लिहिलं आहे हे आधी स्पष्ट करू इच्छितो. या पत्राचे प्रयॊजन आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वक्तव्याविषयीचे आहे.    

बुलढाणा जिल्ह्यातले सिंदखेड राजा हे स्वराज्यप्रेरिका, राजमाता जिजाऊ मां साहेबांचे जन्मस्थान. रयतेच्या माता असणाऱ्या जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असणाऱ्या बुलढाणा शहरापासून, सिंदखेड राजा 80 किमी अंतरावर वसले आहे. जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले, चारही पातशाहयांच्या विरोधात विद्रोह करण्याचे धडे दिले, अतुल्य पराक्रम, साहस, द्रष्टेपण, मुत्सद्दीपणा आणि रयतेच्या प्रेमाच्या बळावर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी स्वराज्य उभे केले. जगाच्या पाठीवर शिवरायांसारखा राजा आढळत नाही. शिवबांच्या अंगी सदगुणांची खाण होती त्यातलाच एक मुख्य म्हणजे स्त्रियांचा आदर सन्मान होय! ‘परस्त्री मातेसमान’ हे पुस्तकी वाक्य त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरलं होतं!

ज्या बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊ जन्मल्या त्याच बुलढाणा शहराचे आमदार संजय गायकवाड यांनी, पेशाने पुस्तक प्रकाशक असणाऱ्या प्रशांत आंबी यांना आई बहिणीवरून अर्वाच्च शिवीगाळ आणि दमदाटी केलीय! प्रशांत आंबी हा तरुण प्रकाशक आहे. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या, ‘शिवाजी कोण होता’ हे अर्थपूर्ण आणि वाचनीय पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे. हे पुस्तक प्रकाशित होऊन तीन दशके उलटून गेलीत. चिथावणीखोरांना अपेक्षित असणारे शिवाजी यात नसल्याने, अकरा वर्षांपूर्वीच पुरोगामी विचारांच्या पानसरे सरांची हत्या करण्यात आली. आजही त्या हत्येचे छुपे समर्थन करणारे नीच समाजात उजळ माथ्याने वावरताना दिसतात. हे कोण लोक आहेत हे वेगळे लिहिण्याची गरज नाही. 

संजय गायकवाड प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून त्यांनी प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय. तुझ्या आईची गां*, तुझ्या बायकोचा टण्णा, तुझ्या मायचा फोद* अशा गलिच्छ शिव्या या इसमाने दिल्या आहेत. आईघा*, हरामखो*, माद**द या त्यांच्या आवडत्या शिव्याही दिल्या आहेत. घरात घुसून मारीन, चिरडुन टाकीन, शंभर पोरे तुझ्यावर सोडतो अशी कारंजी त्यांनी त्यांच्या तोंडामधून उडवली आहेत. इथे शिव्या लिहिण्याचा उद्देश हा की, यांची भाषा किती खालच्या दर्जाची आहे हे कळावे!  

या महाशयांनी एकतर हे पुस्तक वाचलेले नाही. पुस्तक न वाचता त्यांना पुस्तकाचा विरोध करायचा आहे. त्यांच्या संवादात ते एके ठिकाणी म्हणतात की, ‘मी मराठा आहे!’ 
इथे मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच हे पत्र लिहिले आहे! मराठा समाजातील प्रत्येक माणसाला शिवराय आपल्या जातीत जन्माला आले याचा विलक्षण अभिमान आहे, मला देखील आहे! इव्हन हरेक भारतीयास त्यांच्याविषयी आदरभाव आणि प्रेम आहे! शिवराय हे मराठ्यांचे काळीज आहे असं म्हणायचं आणि शिवबांच्या खऱ्या इतिहासापासून दूर जायचं, यात बदल घडायला हवा. 

शिवाजी राजांचे नाव घेऊन हे आमदार म्हणतात की, तुझ्या आईच्या भो*त तलवार घालतो! यात आमदारांची अब्रू जात नाही. शिवबांचे नाव घेण्याचा अशांना हक्क नाही, हे मराठा समाजाने ठणकावून सांगितले पाहिजे. शिव्या देण्याचा यांना इतकाच कंड असेल तर आपल्या आईबापाचे, आवडत्या व्यक्तीचे नाव घेऊन, यांनी काय ती शिवीगाळ करावी! मात्र आपल्या घाणेरड्या मुखातून यांनी राजांचे नाव घेऊ नये हे यांना सांगितले पाहिजे.

या शिवीगाळीच्या संवादात ते एके ठिकाणी म्हणतात की, राजांच्या सेवेतली माझी ही आठवी पिढी आहे! कदाचित हे सत्य असेलही! मात्र त्यांच्या पहिल्या पिढीतले आज कुणी जिवंत असते तर त्यांनीच यांना अद्दल घडवली असती! कारण आपला राजा कसा होता आणि त्यांनी स्त्रियांना कसे सन्मानाने वाढवले होते हे त्या पहिल्या पिढीला नक्कीच ठाऊक असणार! शिवबा आवडतात म्हणायचे आणि घरात घुसून मारतो, चिरडून काढतो ही कसली भाषा!

हे गृहस्थ आमदार आहेत! थोडक्यात एका मतदारसंघाच्या रयतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांना ही भाषा शोभत नाही. बुलढाणा भागातील लोकांनी या महोदयांना याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रत्येक खेपेस लोकप्रतिनिधीलाच जबाबदार धरून भागणार नाही, आपल्या जातीचा माणूस म्हणून वा काही हजार रुपड्यांसाठी यांना मते देणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांनी आणि अन्य मतदारांनीही हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. 

मुळात अलीकडील काळात, शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय झाला आहे याला मराठा समाजाचे जराही ऑब्जेक्शन नाही ही गोष्ट अतिशय शोकात्म आणि निंदनीय आहे! 

मिरवणुकीत डीजे केव्हढा लावला, किती फुटांची मूर्ती बसवली, किती बाय कितीचा मंडप घातला, पोरांना ड्रेस किती दिले, केव्हढा मोठा फ्लेक्स लावला, घोषणाबाजी करत पुढे पुढे येत चमकोगिरी किती केली यावरून एखाद्याला शिवभक्त म्हणणे आधी बंद व्हायला पाहिजे. 

शिवाजी राजे हा मस्तकात आणि हृदयात ठेवायचा अमूल्य ठेवा आहे, त्यांच्या विचारांवर चालणारा युवा घडवायचा असेल तर अभ्यासू आणि विचारी वृत्तीने शिवाजी अभ्यासले पाहिजेत, त्यांचे सखोल वाचन केले पाहिजे! 

संजय गायकवाड यांच्यासारखं पुस्तक न वाचता केवळ शीर्षक एकेरी आहे म्हणून बाह्या सावरत येणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आवर घालण्याचे काम मराठा समाजाने प्रकर्षाने केले पाहिजे. 

मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, छावा संघटना, मराठा महासंघ इत्यादी जितक्याही, सर्व काही मराठा संघटनांनी या संदर्भात एखादी आचारसंहिता जाहीर केली पाहिजे. अशी वक्तव्ये करून काळिमा फासणाऱ्या लोकांचा निषेध केला पाहिजे. दोन जातीत धर्मात तेढ माजवणाऱ्या प्रवृत्ती ओळखता आल्या पाहिजेत, त्यांचा बिमोड केला पाहिजे! 

हे असेच चालू राहिले तर एके दिवशी आड रिकामे होतील आणि पोहऱ्यातही काहीच येणार नाही! मग मी मराठा आहे, माझी अमुक पिढी आहे, आम्ही शिवाजी राजांच्या जातीत जन्मलो आहोत या वल्गना पोकळ ठरतील कारण शिवाजी यांना कळालेच नाहीत! कळले असते तर अशा वांत्या करत गावभर फिरले नसते!

या संजय गायकवाड यांनी भूतकाळात काय दिवे लावले आहेत ते पाहण्यासारखे आहे – मुंबईतील आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याच्या रागातून त्यांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. मार्च 2024 मध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाला पोलिसांच्या लाठीने मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. जुलै 2025 मध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळे मराठा समाजात संताप व्यक्त झाला होता, ज्यावर नंतर त्यांनी माफी मागितली. 1987 मध्ये वाघाची शिकार केल्याचा दावा, पोलिसांना भ्रष्ट म्हणणे आणि मतदारांबद्दल "त्यांना फक्त दारू आणि मटण हवे असते" असे विधान करणे, अशा अनेक कारणांमुळे ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. या तोंडाळ आणि चवचाल व्यक्तीचा निषेध केला पाहिजे असे मराठा समाजातील धुरिणांना वाटत नाही का?

केवळ निवडून येण्याचा निकष लावून आपल्या समाजात अशा जहरी वृत्ती वाढू दिल्या तर एक काळ असा येईल की सारा भोवतालच विखारी होऊन जाईल! शिवाजी राजांनी हेच स्वप्न पाहिले होते का? त्यांचे विचार असे होते का? रयतेतल्या प्रत्येक घटकाविषयी आपल्या राजांची भूमिका कशी होती हे आपण आपल्याच लोकप्रतिनिधींना सांगू शकत नसू तर आपल्याला तर काय अधिकार आहे राजांचे नाव घेण्याचा?

शिवाजी राजे हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून डोक्यात आणि काळजात जतन करायचा अमूल्य ठेवा आहे आणि त्यांच्या विचारांवर आपल्याला चालायचे असेल तर त्यांचे चरित्र अभ्यासले पाहिजे, त्यांचे सर्वांगाने वाचन केले पाहिजे. त्यांची धोरणे, त्यांचे ध्येय, त्यांचे विचार यांनी झपाटले पाहिजे! हे आपण करत नसू आणि निव्वळ दिखाऊगिरी करत असू तर आपण खऱ्या अर्थाने गद्दार आहोत! 

शेवटची नोंद – गोविंद पानसरे सरांची हत्या केल्याचा आरोप ज्याच्यावर होता त्याचे नावही समीर गायकवाड होते. तो आपल्याच समाजाचा भरकटलेला तरुण असावा! माझे नावही तेच आहे! एके काळी मी देखील अशाच विचारांनी भरकटलो होतो! पानसरेंची हत्या झाल्यानंतर आरोपी समीर गायकवाडला पकडल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी माझ्या घरी फोन करून यानेच तर हे केले नाही ना, अशी विचारणा केली होती! आजही या गोष्टींचा मला पश्चाताप होतो. 

आपल्या समाजातील मुलांना भडकवले जाते, आपल्याला चिथावणी दिली जाते आणि आपला वापर होतो हे आपल्या समाजाला कळेनासे झालेय. हे छद्म ओळखायला शिकले पाहिजे, ही एक दुष्टनीती आहे आणि त्यात आपला समाज वाहवत चाललाय. बंधूंनो आणि भगिनींनो आपण यावर गाभार्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे. मगच आपण संजय गायकवाड यांच्या सारख्या मुजोर आणि बेमुर्वत प्रवृत्तींना वेसण घालू शकू.

संजय गायकवाड यांच्या वर्तनात आणि शिवप्रेमात एक विलक्षण विसंगती आहे. छिंदम, भगतसिंग कोश्यारी, सोलापूरकर आणि कोरटकर इत्यादि लोकांनी शिवाजी राजांविषयी गरळ ओकली होती तेव्हा हेच गायकवाड आणि यांचे कर्ते धर्ते तोंड शिवून गप्प होते! मात्र ज्यांनी शिवाजी राजांवर एक अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे त्यांच्यावरुन ते पुस्तक प्रकाशकाला तुला ही पानसरेकडे पाठवतो अशी भाषा करतात! यांना सत्तेत राहायचे असल्याने काहीनी शिवाजी राजांविषयी काहीही विखार वदला तरी हे मौन राहतील कारण यांचे शिवप्रेम खोटे आहे, शिवप्रेम दाखवून सत्तेत राहायचे हे यांचे मनसुबे आहेत! हे ओळखून समाजाने यांना जागेवर आणलं पाहिजे.

तुमचा, 
समीर गायकवाड.

हे पत्र मराठा समाजातील बांधवांना उद्देशून लिहिले असले तरी अन्य शिवप्रेमी जनतेनेही यावर विचार केला पाहिजे! आपण हे किती काळ हे मुक्यागत बघत राहणार आहोत यावर कृती केली पाहिजे

Comments are closed.