ब्रिटीश मौलानाच्या मदरशावर बुलडोझरची कारवाई

संतकबीरनगर येथील अवैध बांधकाम जमीनदोस्त : विदेशी फंडिंग अन् पाक कनेक्शनचा आरोप

वृत्तसंस्था/ संतकबीर नगर

उत्तरप्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये जिल्हा प्रशासनाने अल-हुदा मदरशावर बुलडोझर कारवाई केलीआहे. हा मदरसा ब्रिटिश मौलाना शमशुल हुदा खानशी संबंधित आहे. मौलानावर अवैध विदेशी फंडिंग आणि पाकिस्तान कनेक्शन यासारखे गंभीर आरोप झाले आहेत. कुठलीही मंजुरी न मिळविता हे बांधकाम करण्यात आले होते असे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.

अल-हुदा मदरसा परिसरात रविवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर बुलडोझरने अवैध बांधकाम पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासंबंधी विभागाने 13 जानेवारी रोजी नोटीस जारी केली होती. मधल्या कालावधीत बांधकाम वैध करविण्यासाठी आवश्यक दस्तऐवज सादर करण्यात आले नव्हते. तर तपासणीत बांधकाम नियमांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाल्यावर ते पाडण्याचा आदेश देण्यात आला होता.

ही कारवाई रोखण्यासाठी मौलाना शमसुल हुदा खानने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु त्याची याचिका फेटाळण्यात आली. मौलाना शमसुल हुदा खान हा यापूर्वीच तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. मौलानावर अवैधमार्गाने विदेशी फंडिंग मिळविणे अणि संशयास्पद आंतरराष्ट्रीय संपर्क बाळगण्याचे आरोप झाले आहेत.

Comments are closed.