पंत आणि बुमराहच्या 'त्या' कमेंटवर टेंबा बावुमाचा मोठा खुलासा! प्रशिक्षकाच्या चुकीच्या शब्दांवरही स्पष्टच बोलला

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी आणि वनडे कर्णधार टेंबा बावुमाने (Temba Bavuma) भारतीय खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah & Rishbh Pant) आणि ऋषभ पंत यांच्याबद्दल एक खळबळजनक खुलासा केला आहे. मैदानावर बावुमाच्या उंचीवरून (Height) झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे.

कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान बुमराह आणि पंत यांनी बावुमाच्या उंचीवरून त्यांच्या भाषेत काही कमेंट्स केल्या होत्या. बावुमाने सांगितले की, त्यांनी माझ्या उंचीवरून मला ‘बौना’ (बुटका) म्हटले होते. त्या वेळी मला ते नीट ऐकू आले नव्हते, पण नंतर माझ्या मीडिया मॅनेजरने मला त्याबद्दल सांगितले.

बावुमाने ईएसपीएनक्रिकइन्फो’मधील आपल्या लेखात लिहिले आहे की, दिवसाच्या शेवटी ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह माझ्याकडे आले आणि त्यांनी आपल्या वागणुकीबद्दल माफी मागितली. जेव्हा त्यांनी माफी मागितली, तेव्हा मला तो विषय नेमका काय आहे हे माहीतही नव्हते.

बावुमा पुढे म्हणाला, मैदानावर जे घडते ते तिथेच राहते, पण समोरचा काय बोलला हे तुम्ही विसरत नाही. मी या गोष्टीचा वापर स्वतःला प्रेरणा देण्यासाठी केला. आमच्यात आता कोणतेही वैर नाही.

दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुकरी कॉनराड यांनी ‘भारताला गुडघ्यावर आणू’ असे विधान केले होते. यावर बावुमा म्हणाला की, माझ्या मते प्रशिक्षकांनी असे शब्द वापरणे टाळायला हवे होते. त्यांनी अधिक चांगल्या शब्दांची निवड करायला हवी होती.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 25 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. मात्र, वनडे आणि टी-20 मालिकेत भारताने पाहुण्या संघाचा पराभव केला.

Comments are closed.