‘द बर्निंग बस’… समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ ट्रॅव्हल जळून खाक ; ३५ प्रवासी थोडक्यात बचावले, चालक फरार
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास पुण्याहून पुसदकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने, या आगीतून ट्रॅव्हल्समधील ३५ प्रवासी थोडक्यात बचावले असून, एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स क्रमांक MH 38 F 3899 ही पुण्यावरून पुसदकडे जात होती. शनिवारी (दि. २ मे) सायंकाळी ५:२० वाजेच्या सुमारास मेहकर जवळ नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २९५.७०० जवळ ही गाडी आली असता, गाडीच्या मागील बाजूने अचानक धूर निघू लागला. मागून येणाऱ्या वाहनचालकांनी ही बाब ट्रॅव्हल्स चालकाच्या लक्षात आणून दिली. चालकाने तत्काळ गाडी महामार्गाच्या कडेला उभी केली.
गाडीने पेट घेताच प्रवाशांमध्ये मोठी धावपळ उडाली. गाडीत एकूण ३५ प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले, मात्र खाली उतरत असताना बबन कदम (वय ४८, रा. पुसद) यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, घटनेनंतर चालक आकाश जमदाडे (रा. पुसद) हा घटनास्थळावरून फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजी नगर आणि महामार्ग पोलीस उपकेंद्र फर्दापूरचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत हवालदार क्र. ९९८, पोलीस कॉन्स्टेबल १५५९, २७३१, २६११ व एम.एस.एफ.चे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसार, ५:३० वाजता माहिती मिळताच ५:४५ पर्यंत पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते आणि सायंकाळी ७ वाजेपर्यंत मदतकार्य पूर्ण करण्यात आले.
Comments are closed.