वीजवाहिनीच्या संपर्कात आल्यानंतर बसला आग, 3 जणांचा मृत्यू
10 हून अधिक जण होरपळले : देशात 15 दिवसांत 5 वी मोठी बस दुर्घटना
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानच्या जयपूर ग्रामीण जिल्ह्यातील शाहपुरा येथे मंगळवारी सकाळी मोठी बस दुर्घटना घडली आहे. विटभट्टीवरील मजुरांनी भरलेल्या बसचा 11 हजार वोल्टच्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीशी संपर्क झाला. यामुळे क्षणार्धात बसमध्ये वीजप्रवाह संचारित होत आग लागली. पाहता-पाहता बसमधील प्रवासी याच्या तडाख्यात सापडले. दुर्घटनेत 3 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सुमारे 12 मजूर गंभीर स्वरुपात होरपळले आहेत.
ही बस उत्तरप्रदेशातून मजुरांना घेऊन टोडी येथील विटभट्टीच्या दिशेने प्रवास करत होती. परंतु रस्त्यावत बसच्या वरील हिस्स्याचा उच्चदाबाच्या वाहिनीशी संपर्क होताच मोठा स्फोट झाला आणि वेगाने आग फैलावली. घटनेनंतर तेथे खळबळ उडाली आणि मजुरांचा आक्रोश ऐकून परिसरातील लोकांनी तेथे धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना कळविले.
जखमींना शाहपुरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना जयपूर येथे हलविण्यात आले आहे. अग्निशमन दलाला अथक प्रयत्नानंतर बसमध्ये लागलेली आग विझविण्यास यश आले आहे. तर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत. या दुर्घटनेच्या कारणांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. प्रारंभिक तपासात उच्च दाबाच्या वीजवाहिनीपासून बस अत्यंत नजीकहून गेल्याने ही दुर्घटना घडल्याचे मानले जात आहे. प्रशासनाने वीटभट्टी संचालक आणि बसचालकाच्या भूमिकेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Comments are closed.