स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने बसला आग लागली

कुर्नूल बस दुर्घटनाप्रकरणी प्राथमिक तपासात निष्कर्ष : बसमध्ये होते 234 स्मार्टफोनचे पार्सल : चालक, क्लीनरला अटक

वृत्तसंस्था/ कुर्नूल

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे झालेल्या बस अपघातात एक नवीन खुलासा समोर आला आहे. बसला लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाच आता सदर बसमध्ये 234 स्मार्टफोन असलेले एक पार्सल असल्याची माहितीही उजेडात आली आहे. या पार्सलमधील स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यामुळे आग वेगाने पसरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. आग ताबडतोब भडकल्यामुळे प्रवासी पळून जाऊ शकले नाहीत, असे फॉरेन्सिक टीमचे म्हणणे आहे. दरम्यान, कुर्नूल पोलिसांनी चालक मिर्याला लक्ष्मैया आणि घटनास्थळावरून पळून गेलेल्या क्लिनरला अटक केली आहे. आग लागल्यानंतर बस थांबली तेव्हा दोघांनीही अपघाताच्या तीव्रतेची जाणीव होताच दरवाजातून उडी मारली होती.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील चिन्नाटेकुरु गावाजवळ बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत 20 जणांचा जळून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 19 प्रवासी आणि बसला धडकलेल्या दुचाकीस्वाराचा समावेश होता. अन्य प्रवाशांनी बसमधून उडी मारून बचाव केल्यामुळे ते बचावले होते. या दुर्घटनेत गंभीर होरपळलेल्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुचाकीचालक मद्यधुंद अवस्थेत

दरम्यान, या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला असून बसला धडकणारा दुचाकीस्वार शिवशंकर हा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातसमयी शिवशंकर मद्यधुंद अवस्थेत होता. अपघात घडण्यापूर्वी शिवशंकर हा घटनास्थळाजवळील पेट्रोलपंपावर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. या फुटेजमध्ये तो मद्यधुंद असल्यामुळे दुचाकी चालवतानाही वेगळ्याच हालचाली करताना दिसत आहे. हे फुटेज 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:22 वाजताचे आहे. पेट्रोल पंपावर मोटारसायकलवर दोन पुरुष दिसतात. त्यापैकी एक नंतर दिसत नाही.

46 लाख रुपयांच्या स्मार्टफोनचे बेंगळूरला पार्सल

बसमध्ये स्फोट झालेले 234 स्मार्टफोन अंदाजे 46 लाख रुपये किमतीचे होते. हैदराबादमधील एक व्यापारी मंगनाथ हे ते पार्सलद्वारे बेंगळूरला पाठवत होते. हे पार्सल एका ई-कॉमर्स कंपनीच्या नावे पाठविण्यात आले होते. बसला आग लागली तेव्हा या स्मार्टफोनमधील बॅटरी फुटल्याचा आवाज ऐकू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अग्निशमन दलाचे डीआयजी पी. वेंकटरमण म्हणाले की, स्मार्टफोन्स व्यतिरिक्त बसच्या एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बॅटरीजचाही स्फोट झाला. आग इतकी भीषण होती की बसमधील अॅल्युमिनियम शीट वितळल्या. वितळलेल्या शीटमधून हाडे आणि राख पडताना आम्ही पाहिल्याचेही त्यांनी स्पष्ट पेले.

बसला अपघात झाल्यानंतर आगीतून बाहेर पडलेल्या लक्ष्मैय्या नामक चालकाने बसच्या खालच्या भागात असलेल्या चाकांमधील सामानाच्या रॅकमध्ये झोपलेल्या दुसऱ्या ड्रायव्हरला जागे केले. तसेच जेव्हा त्यांना लक्षात आले की ते गाडीत चढू शकत नाहीत, तेव्हा त्यांनी टायर बदलणाऱ्या रॉडने खिडक्या फोडण्यास सुरुवात केल्यामुळे काही प्रवासी बचाव करू शकले. तथापि, आगीने संपूर्ण बस वेढल्यानंतर दोघे घाबरून घटनास्थळावरून पळून गेले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Comments are closed.