Video – फेरीवर वाहन चढवताना चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस पद्मा नदीत कोसळली; 24 प्रवाशांना जलसमाधी, अनेक जण बेपत्ता

बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. दौलतदिया फेरी टर्मिनलजवळ बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बस थेट पद्मा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 24 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असून ईदची सुट्टी घालवून हे सर्व जण माघारी परतत होते. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 40 प्रवाशांना घेऊन ही बस राजबारीहून राजधानी ढाकाकडे निघाली होती. सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही बस फेरीमध्ये चढत असताना एका युटिलिटी फेरीने तिला जोरदार धडक दिली. हा धक्का इतका भीषण होता की चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट नदीच्या पात्रात कोसळली. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. बचाव आणि शोधमोहिमेबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक रसेल मोल्लाह यांनी सांगितले की, आतापर्यंत 24 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. अग्निशमन दल, नौदल आणि पोलीस दलाच्या माध्यमातून संयुक्त बचावकार्य राबवले जात आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री अंधारामुळे बचावकार्यात अडथळे आल्याने ते तात्पुरते थांबवावे लागले होते, मात्र गुरुवारी सकाळी पुन्हा पूर्ण क्षमतेने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या अपघातात काही प्रवासी पोहून बाहेर पडले, तर काहींना घटनास्थळी उपस्थित लोकांनी वाचवले. बसमधील काही प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.