लखनौमध्ये भरदिवसा व्यावसायिकाची हत्या.

वृत्तसंस्था/ लखनौ

लखनौमधील कल्ली वेस्ट परिसरात बुधवारी दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास जौनपूरचे रहिवासी असलेल्या व्यावसायिक संदीप कुमार (40) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडत त्यांची हत्या केली.  गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलिसांची अनेक पथके त्यांचा शोध घेत आहेत. हल्लेखोरांना केलेल्या गोळीबारावेळी एक गोळी छातीत, एक पोटात आणि एक डोक्यात लागल्याचे पोलिसांनी सांगितले. भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या संदीप यांना एपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचाराअंती त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सायंकाळी उशिरा उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. संदीप कुमार हे सध्या रिअल इस्टेटमध्ये काम करत होते. ते पीजीआयच्या वृंदावन कालिंदी पार्कजवळ भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचे कल्ली वेस्ट परिसरात प्रॉपर्टी डीलिंगचे कार्यालय आहे. नेहमीप्रमाणे, बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते त्यांचे कर्मचारी विपिन कुमार यांच्यासोबत कारमधून ऑफिससाठी निघाले असताना त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे डीसीपी अमित आनंद यांनी सांगितले.  दरम्यान, हल्लेखोर दुचाकीवरील एका साथीदारासह रायबरेली रोडच्या दिशेने पळून गेला.

Comments are closed.