जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा – सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत तिने द्वितीय मानांकित चीनच्या वांग झीवर सरळ गेममध्ये मात केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकलेल्या सिंधूने चीनच्या वांग झीविरुद्ध पुन्हा वर्चस्व राखले. उभय खेळाडूंमध्ये आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात सिंधूचा हा तिसरा विजय होय. 15व्या मानांकित सिंधूने चुरशीचा पहिला गेम 21-19 ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये 12-6 अशी आघाडी घेतली आणि अखेर 21-15 ने गेम जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूपुढे अव्वल मानांकित दक्षिण कोरियाच्या आन से यंग हिचे आव्हान असण्याची शक्यता आहे.
Comments are closed.