सात्त्विक-चिरागचे पुन्हा स्वप्न भंग, पूर्ण वर्ष जेतेपदाविनाच संपले
हिंदुस्थानच्या बॅडमिंटनविश्वातील आघाडीची जोडी सात्त्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे स्वप्न पुन्हा एकदा अर्ध्यावरच तुटले. बीडब्ल्यूएफ जागतिक टूरच्या उपांत्य फेरीत चीनच्या लियांग वेई पेंग आणि वांग चांग या जोडीसमोर सात्त्विक-चिराग यांना 21-10, 17-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवासह सात्त्विक-चिराग जोडीचे हे संपूर्ण वर्ष एकही जेतेपद न जिंकताच संपले. दोनदा अंतिम फेरी आणि सहावेळा उपांत्य फेरी गाठूनही पदक हातातून निसटणे, ही वेदना या जोडीसाठी अधिक बोचरी ठरली.
पहिल्या गेममध्ये वर्चस्व, नंतर खेळ
सामन्याच्या सुरुवातीलाच सात्त्विक-चिराग यांनी आक्रमक खेळ करत पहिला गेम एकतर्फी जिंकला. पहिल्या गेममध्ये त्यांनी नऊपैकी आठ गुण पटकावत 11-6 अशी आघाडी घेतली आणि 12-10 नंतर सलग नऊ गुण मिळवत गेम खिशात घातला. त्या क्षणी हिंदुस्थानी चाहत्यांना विजय जवळ आल्याचा भास झाला.
दुसऱ्या गेममध्ये मात्र चिनी जोडीने हिंदुस्थानी जोडीचा गेम केला. सामन्याचं चित्र बदललं. 12-12 पर्यंत सामना बरोबरीत होता. त्यानंतर चिनी जोडीने सात्त्विक-चिराग यांना कोर्टच्या दोन्ही टोकांना धावायला लावलं. जोरदार स्मॅशसाठी आवश्यक वेळ आणि जागा न मिळाल्याने हिंदुस्थानी जोडीची ताकद निप्रभ ठरली. लांबच लांब रॅलीऐवजी छोटे, वेगवान पॉइंट्स खेळत चीनने सामना आपल्या बाजूला वळवला. 18-16 गुण असताना झालेली 22 फटक्यांची रॅली ही या गेममधील सर्वात लक्षवेधी ठरली. 19-17 ला सात्त्विककडून झालेल्या दुबळय़ा सर्व्हिस रिटर्नने चीनला गेम पॉइंट मिळाला आणि वांग चांगच्या अचूक ड्रॉप शॉटने तो गेम संपवला.
निर्णायक गेममध्ये पूर्ण वर्चस्व, स्वप्न विरघळणे
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये चीनने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. 4-0 अशी आघाडी घेतल्यानंतर ती 11-2 पर्यंत वाढवली. त्या क्षणी सात्त्विक-चिराग यांच्या चेहऱ्यावर असहाय्यता स्पष्ट दिसत होती. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली गेली, पण सामना हातातून निसटला.
‘जवळ जाऊनही दूर’
एकामागोमाग एक मोठय़ा स्पर्धांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही जेतेपद न मिळणं, ही सात्त्विक-चिराग यांची यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी शोकांतिका ठरली. मेहनत, काwशल्य आणि जिद्द असूनही निकाल साथ देत नव्हते. हीच या पराभवाची सर्वात मोठी वेदना ठरली.
Comments are closed.