ठाणे कारागृहातील ‘केक’ची लाखोंची विक्री, रुचकर, दर्जेदार आणि आरोग्यदायी; प्रशासनाला पाच दिवसांत नऊ लाखांचे उत्पन्न

आशिष बनसोडे, मुंबई

दरवर्षी नाताळनिमित्त ठाणे कारागृहात बनलेल्या केकला यंदाही खरेदी करण्यासाठी मोठी पसंती मिळत आहे. चविष्ट, रुचकर आणि हलकाफुलका, पण तितक्याच आरोग्यदायी असणाऱ्या केकला चांगलीच मागणी होत आहे. पाच दिवसांत जवळपास 30 हजार कप तर अडीच हजार किलो स्पंज केकची हातोहात विक्री झाल्याने कारागृहाला यावेळी नऊ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

नाताळनिमित्तदेखील कारागृहातील 12 कैदी बेकरीत कप आणि स्पंज केक बनवत आहेत. पण सालाबादप्रमाणे यंदाही नाताळला कप केक सर्वात भारी ठरला. कारागृहाबाहेरील शोरूममध्ये केक विक्रीसाठी ठेवल्यानंतर ते खरेदी करण्यासाठी नागरिक आवर्जून हजेरी लावत आहेत. बाजारात अन्य नामांकित केक विक्रीसाठी असतानाही यावेळी पाच दिवसांत तब्बल 29 हजार 279 कप केकची विक्री झाली. त्यातून  गेल्या वेळी 25 हजार 416 कप केकची विक्री झाली होती. त्यातून चार लाख 39 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.  तर यावेळी दोन हजार 507 किलो स्पंज केकचीदेखील विक्री झाल्याची माहिती कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी दिली.

भायखळा कारागृहात प्रार्थना अन् केकचे वाटप

भायखळा कारागृहात कैद्यांमध्ये काही ख्रिश्चन कैदीदेखील आहेत. त्यांच्यासाठी कारागृहात गुरुवारी सकाळी प्रार्थनेचे आयोजन केले आहे. त्यानंतर मागणीनुसार कैद्यांना ठाणे कारागृहातून खरेदी केलेला केक देण्यात येणार असल्याचे तुरुंगाधिकारी टेंगले यांनी सांगितले.

सालाबादप्रमाणे यंदाच्या नाताळलादेखील केकचा बेत होता. 12 कैद्यांनी यावेळीदेखील बेकरी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार, रुचकर केक व त्याबरोबर अन्य खाद्यपदार्थ बनवले. – राणी भोसले,अधीक्षक, ठाणे कारागृह

बालकांसाठी गंमत जंमत

भायखळा कारागृहात बंदिस्त असलेल्या कैदी महिलांच्या सहा वर्षांखाली बालकांसाठी बालवाडी आहे. या बालवाडीत आज खास बालगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मुलांनी बालगीतांवर धम्माल मस्ती केली.

Comments are closed.