मला हुकूमशहा म्हणा, काही फरक पडत नाही! महापौर ममदानी यांच्यासमोर ट्रम्प यांचे पत्रकारांना उलट उत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यूयॉर्क सिटीचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी या दोघांमध्ये शुक्रवारी ‘व्हाईट हाऊस’मध्ये पहिल्यांदाच भेट झाली. या वेळी मोठय़ा संख्येने पत्रकारही उपस्थित होते. या दोन नेत्यांच्या भेटीवेळी पत्रकारांनी ममदानी यांना विचारले की, ‘‘तुम्ही अजूनही ट्रम्प यांना हुकूमशहा मानतात का?’’ यावर ट्रम्प यांनी उलट उत्तर देत म्हटले की, ‘‘काही हरकत नाही, हो म्हणा, त्यांना दर्जा द्या. ते समजावून सांगण्यापेक्षा सोपे आहे. मला त्याचा काही फरक पडत नाही. आम्हाला न्यूयॉर्क पुन्हा एकदा महान बनवायचे आहे. ममदानी जितके चांगले काम करतील तितका मी आनंदी असेन,’’ असेही ट्रम्प या वेळी म्हणाले.
ट्रम्प आणि ममदानी यांच्यात जोरदार चर्चा होण्याची अपेक्षा होती, परंतु भेटीदरम्यान वातावरण खूपच सौहार्दपूर्ण राहिले. ट्रम्प यांनी ममदानींचे कौतुक केले आणि म्हटले की, त्यांची भेट खूप चांगली राहिली आहे. ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या भेटीदरम्यान ट्रम्प आणि ममदानी यांनी हस्तांदोलन केले. ममदानी यांच्याशी भेट घेतल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, ‘‘काही मुद्दय़ांवर त्यांचे मत वेगवेगळे असले तरी चर्चेतून निश्चित तोडगा निघेल.’’ ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, दोन्ही नेत्यांचे ध्येय न्यूयॉर्कला पुन्हा एक उत्तम शहर बनवण्याचे आहे. जर ममदानी यांनी उत्तम काम केले आणि शहरात सकारात्मक बदल घडवून आणला तर त्यांना सर्वात जास्त आनंद होईल असे ते म्हणाले. दरम्यान, न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान दोघांनी एकमेकांविरुद्ध तीव्र टीका केली होती. ट्रम्प यांनी ममदानींना ‘कम्युनिस्ट वेडा’ आणि ‘जिहादी’ म्हटले होते, तर ममदानींनी ट्रम्प यांना ‘हुकूमशहा’ आणि ‘फॅसिस्ट’ म्हटले होते. तर ट्रम्प यांनी ममदानींच्या धोरणांवर टीका केली होती. ममदानींचा विजय न्यूयॉर्कसाठी सर्वात वाईट गोष्ट असेल, असेही म्हटले होते. जोहरान ममदानी नावाचा एक पूर्णपणे कम्युनिस्ट वेडा डेमोक्रॅटिक प्रायमरी जिंकला आहे आणि तो महापौर होण्याच्या मार्गावर आहे. तो भयानक दिसतो, त्याचा आवाज खडबडीत आहे आणि तो फारसा हुशार नाही. तर ममदानींच्या विजयानंतर, ट्रम्प यांनी त्यांचा उच्चार चुकीचा ठमंडानीठ करून त्यांची खिल्ली उडवली होती.

Comments are closed.