कंबोडिया-थायलंडने युद्धविराम घोषित केले
अमेरिका, चीनने केली मध्यस्थी : युद्धात आतापर्यंत 35 हून अधिक लोकांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ बँकॉक, क्वालालंपूर
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी थायलंडसोबत सुरू असलेल्या सीमा वादात युद्धबंदीची घोषणा केली आहे. दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी युद्ध थांबवण्यात आले असून शांतता चर्चेला प्रारंभ करण्यात आला आहे. चीन आणि अमेरिकेने या युद्धबंदीत मध्यस्थी केली आहे. सोमवारी मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा झाली. थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी या बैठकीत भाग घेतला. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
कंबोडिया आणि थायलंड या दोन्ही देशांमधील सीमावादामुळे गेल्या काही दिवसांत जोरदार संघर्ष निर्माण झाला होता. या संघर्षात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतेक नागरिक आहेत. मलेशिया सध्या आग्नेय आशियाई राष्ट्र संघटनेचे (आसियान) अध्यक्ष आहे. त्यांनी दोन्ही देशांना चर्चेसाठी पाचारण केले असून क्वालालंपूरमध्ये शांतता चर्चा सुरू करण्यात आली आहे. सोमवार, 28 जुलै रोजी मलेशियामध्ये चर्चेला प्रारंभ झाला. थायलंडचे काळजीवाहू पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी प्रशासकीय राजधानी पुत्रजया येथे दुपारी 3:15 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता) त्यांच्या चर्चेला सुरुवात केली. त्यांची भेट आसियान गटाचे अध्यक्ष असलेले मलेशियन नेते अन्वर इब्राहिम यांच्या निवासस्थानी झाली. या भेटीवेळी चीन आणि अमेरिकेचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
जंगलाने वेढलेल्या वादग्रस्त सीमेवरून दोन्ही देशांमधील लष्करी संघर्षात किमान 35 लोक मारले गेले आहेत. वादग्रस्त क्षेत्रावर बराच काळ लढत असताना दोन्ही देशांनी रॉकेट, गोळे आणि बंदुकांच्या मदतीने एकमेकांवर हल्ला केल्याने दोन लाखांहून अधिक लोकांना सीमावर्ती भागातून विस्थापित व्हावे लागले आहे. 2008-2011 दरम्यान या प्रदेशात झालेल्या हिंसाचारानंतरचा हा सर्वात मोठा लष्करी संघर्ष होता. या सीमावर्ती भागात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. 1907 मध्ये कंबोडियाच्या फ्रेंच वसाहतवादी प्रशासकांनी केलेल्या अस्पष्ट सीमांकनांमुळे दोन्ही देश त्यावर दावा सांगतात.
डोनाल्ड ट्रम्प यांचे दबावतंत्र
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी या वादात हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणला होता. युद्धबंदी केली नाही तर सध्या सुरू असलेल्या व्यापार करारावरील चर्चा थांबवाव्या लागतील असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. तसेच थायलंड आणि कंबोडियामधील संघर्ष सोडवणे हे आपल्यासाठी सोपे काम आहे, कारण आपण यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधील वाद सोडवल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला होता.
Comments are closed.