बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला

येत्या गुरुवारी 121 मतदारसंघांमध्ये आहे मतदान

वृत्तसंस्था / पाटणा, नवी दिल्ली

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रथम टप्प्यातील जाहीर प्रचाराची सांगता झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच वाचता या टप्प्यातील 121 मतदासंघांमध्ये जाहीर प्रचार थंडावला. या टप्प्यासाठी येत्या गुरुवारी, अर्थात 6 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रचाराच्या आजच्या अखेरच्या दिनी सर्व पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी जीव तोडून प्रचार करुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

या टप्प्यात पाटणा, दरभंगा, माधेपुरा, सहरसा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, शेखपुरा, नालंदा, बक्सर आणि भोजपूर अशा 17 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदानाची सर्व सज्जता केली आहे. सर्व मतरारसंघांमधील सर्व मतदानकेंद्रांवर पुरेशा सुरक्षा व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. मतदारांसाठी सोयीसुविधाही उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

चुरशीचा संघर्ष

या टप्प्यातील सर्व मतदारसंघ प्रामुख्याने बिहारच्या मध्यभागातील आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी महागठबंधन यांच्यात तीव्र चुरस असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत संयुक्त जनता दल, भारतीय जनता पक्ष, लोकजनशक्ती (रामविलास पासवान) पक्ष आणि दोन छोटे पक्ष आहेत. तर महागठबंधनमध्ये राष्टीय जनता दल, काँग्रेस, डावे पक्ष आणि काही छोटे पक्ष आहेत. निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षही यावेळी प्रथमच स्पर्धेत आहे.

 

Comments are closed.