भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करा!
पंतप्रधान मोदींना राहुल गांधींचे आव्हान : एपस्टीन अन् अदानी प्रकरणाची भीती असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील भोपाळ येथे काँग्रेसच्या वतीने आयोजित किसान महाचौपालला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारला अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरून लक्ष्य केले आहे. नरेंद्र मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अमेरिकेसोबतचा व्यापार करार रद्द करून दाखवावा. परंतु मोदी हे करू शकत नाहीत. त्यांच्या डोक्यावर एपस्टीन फाइल्सची भीती अन् अदानींच्या अटकेची टांगती तलवार आहे. नरेंद्र मोदींनी सर्व डाटा अमेरिकेच्या स्वाधीन केला आहे. नरेंद्र मोदींना आता कुठलीच शक्ती वाचवू शकत नाही अशी टिप्पणी राहुल यांनी केली आहे.
भारत आणि अमेरिका व्यापार करार 4 महिन्यांपासून रखडला होता. परंतु लोकसभेत मी भाषण करताच पंतप्रधान मोदींनी त्वरित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन लावला आणि व्यापार करारावर स्वाक्षरीसाठी तयार असल्याचे कळविले होते. या व्यापार करारामुळे अमेरिकेच्या मोठ्या कंपन्यांना भारताची कृषी बाजारपेठ खुली होणार आहे. पंतप्रधानांनी देशाचे कृषिक्षेत्र अन् वस्त्राsद्योग अमेरिकेला विकल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
अमेरिकेत जेफ्री एपस्टीनच्या लाखो फाइल्स आहेत, यात ईमेल, मेसेज आणि व्हिडिओ असून ते जगासमोर आणले गेले नाहीत. या फाइल्सच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच नाव धमकाविण्यासाठी उघड करण्यात आले आहे. आमचे म्हणणे ऐकले नाही तर या फाइल्समधील नावे उघड केली जातील अशी धमकी ट्रम्प प्रशासनाकडून मोदींना मिळाली असावी असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
अनिल अंबानींसोबत कोणते नाते?
अनिल अंबानी माझे मित्र नाहीत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनिल अंबानींसोबत कोणते नाते आहे? त्या फाइलमध्ये अनिल अंबानी आणि हरदीप पुरी यांचे नाव आहे. याचबरोबर अदानींविरोधात अमेरिकेत न्यायालयीन प्रकरण सुरू आहे. अदानी हे अमेरिका आणि युरोपमध्ये जाऊ शकत नाहीत, त्यांना तेथे पकडून तुरुंगात डांबले जाईल अशी टिप्पणी राहुल यांनी केली आहे.
करारामागे दोन कारणे
अमेरिकेचे लक्ष्य अदानी नव्हे तर नरेंद्र मोदी आहेत. याचमुळे मोदींनी ट्रम्प यांना फोन करून आपण व्यापार करारावर स्वाक्षरीसाठी तयार असल्याचे कळविले होते. मोदींनी देशच विकला आहे. हीच भावना भाजप अन् संघ कार्यकर्त्यांच्या मनातही निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी तडजोड केल्याचे त्यांच्या डोळ्यात पाहिल्यास स्पष्टपणे दिसून येते. हा करार नव्हे तर शेतकऱ्यांवर केलेला आघात असल्याचा दावा राहुल यांनी केला.
Comments are closed.