पुढील तीन वर्षांत प्रत्येक जिल्ह्यातील कर्करोग सेवा केंद्र
मध्यप्रदेशमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची घोषणा : बागेश्वर धाम येथे वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ बुंदेलखंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसांच्या मध्यप्रदेश दौऱ्यादरम्यान रविवारी बुंदेलखंडला पोहोचले. या भेटीदरम्यान त्यांनी बालाजी मंदिराला भेट देत प्रार्थना केली. त्यानंतर कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी ‘जय जटाशंकर धाम’ या घोषणेसह आपले भाषण सुरू करत आगामी तीन वर्षात देशातील प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग सेवा केंद्र उभारणार असल्याची घोषणा केली. केंद्र सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात कर्करोगाशी लढण्यासाठी अनेक घोषणा केल्या असून कर्करोगाची औषधे स्वस्त करण्याचा निर्णयही घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील छतरपूर येथे बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. 218 कोटी रुपये खर्चून बांधली जाणारी ही संस्था कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी समर्पित असेल आणि संपूर्ण बुंदेलखंड प्रदेशाला याचा फायदा होईल असा दावा केला जात आहे. यावेळी बोलताना पुढील तीन वर्षांत देशातील प्रत्येक जिह्यात कर्करोग डे केअर सेंटर उघडले जातील, असे पंतप्रधान म्हणाले. देशाने मला लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे आणि मी सबका साथ, सबका विकास या मंत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पाचा सर्वात मोठा आधार म्हणजे ‘सर्वांचे उपचार, सर्वांचे आरोग्य’, असेही ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांना विरोध करणाऱ्यांवर टीका केली. यावेळी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्राr यांनी पंतप्रधान मोदींना ‘भारताचे महान पंतप्रधान’ म्हटले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी बागेश्वर धाम बालाजी मंदिरात प्रार्थना केली. आपले मठ आणि मंदिरे सामाजिक जाणीवेची केंद्रे आहेत, असेही ते म्हणाले. एकीकडे, आपली मंदिरे, आपले मठ, आपली पवित्र स्थळे ही पूजा-संसाधनांची केंद्रे आहेत आणि दुसरीकडे, ती विज्ञान आणि सामाजिक जाणीवेची केंद्रे आहेत. आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला आयुर्वेदाचे विज्ञान दिले. आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला योगाची शिकवण दिली असून त्याचा झेंडा आज संपूर्ण जगात उंच फडकत आहे, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
हा एकतेचा महान कुंभ
प्रयागराज येथील महाकुंभात पंतप्रधान मोदींनी स्वच्छता कर्मचारी आणि पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘आपण पाहत आहोत की महाकुंभाची सर्वत्र चर्चा होत आहे. महाकुंभ आता पूर्णत्वाच्या जवळ आला आहे. आतापर्यंत कोट्यावधी लोक तिथे पोहोचले आहेत. कोट्यावधी लोकांनी पवित्र स्नान केले आहे, संतांचे दर्शन घेतले आहे. जर आपण या महाकुंभाकडे पाहिले तर आपल्याला स्वाभाविकपणे असे वाटते की हा एकतेचा महाकुंभ आहे.
आम्ही मनापासून देशसेवा करतो : शास्त्राr
कार्यक्रमादरम्यान, धीरेंद्र शास्त्राr यांनी पंतप्रधान मोदींना बालाजीची मूर्ती भेट दिली. त्यांना सनातन धर्मावरील एक पुस्तक आणि एक स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. व्यासपीठावरून पंतप्रधानांचे स्वागत करताना धीरेंद्र शास्त्राr म्हणाले, ‘आपल्याला असे पंतप्रधान मिळाले आहेत जे संत आणि महंतांबद्दल बोलतात. आतापर्यंत रुग्णालयांमध्ये मंदिरे होती आणि आता मंदिरांमध्येही रुग्णालये असतील. बुंदेलखंडसाठी हे सर्वात मोठे वरदान आहे. विश्वामित्रांचा भारत विश्वामित्रांची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. धीरेंद्र शास्त्राr यांनी व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींच्या जागतिक स्तरावर वाढत्या प्रतिष्ठेबद्दलही भाष्य केले.
मोदींच्या आईच्या नावाने एक वॉर्ड
बागेश्वर धाम प्रमुखांनी असेही सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांच्या नावाने एक वॉर्डदेखील असेल. ते म्हणाले, हे रुग्णालय दोन ते तीन वर्षांत पूर्ण होईल. ते वैद्यकीय महाविद्यालय बनवण्याचा विचार आहे. रुग्णालये वैद्यकीय सेवा आणि औषधे देखील पुरवतील. यात पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या नावाने रुग्णालयात एक वॉर्ड बांधला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
पंतप्रधान मोदी बागेश्वर धाम येथे पोहोचताच पंडित धीरेंद्र शास्त्राr, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि खजुराहोचे खासदार व्ही. डी. शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. बालाजी मंदिराला भेट दिल्यानंतर पंतप्रधानांनी रुग्णालयाचे भूमिपूजन केल्यामुळे परिसरातील आरोग्य सुविधांचा विस्तार होणार आहे.
Comments are closed.