INDvsAUS: टीम इंडियाला मोठा झटका! सामन्यादरम्यान खेळाडू दुखापतग्रस्त, बीसीसीआयने दिले अपडेट्स

भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. यामध्ये खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. आजपासून (२४ फेब्रुवारी) वनडे मालिकेला सुरूवात झाली असून यामध्ये भारताची सुरूवात निराशाजनक झाली आहे. यातील पहिलाच सामना भारताने ६ विकेट्सने गमावला. हा पराभव एक झटकाच असून भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर सामन्यावेळी दुखापतग्रस्त झाली. तिच्याबद्दलेच अपडेट बीसीसीआयने दिले आहे.

या सामन्यात हरमनप्रीतने अर्धशतकी खेळी केली. तिने ८३ चेडूत ५३ धावा केल्या. तसेच काश्वी गौतमसोबत ५३ धावांची भागीदारी केली. यावेळी तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या एक्सच्या अकाउंटवर त्याचे अपडेट दिले. त्यामध्ये लिहिले, हरमनप्रीतच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असून ती दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण नाही करत. बीसीसीआयचे मेडीकल स्टाफ तिच्यावर उपचार करत आहेत. यामुळे उप-कर्णधार स्मृती मानधना संघाचे नेतृत्व करेल.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये हरमनप्रीतबरोबर स्मृतीनेही अर्धशतकी खेळी केली. मात्र बाकी खेळाडूंनी निराशा केल्याने भारताने ४८.३ षटकांत सर्व विकेट्स गमावत २१४ धावा केल्या. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियासाठी छोटे ठरले. त्यांनी ते ३८.२ षटकातच पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाकडून विकेटकीपर-फलंदाज बेथ मूनीने सर्वाधिक अशा ७६ धावा केल्या. कारकिर्दीतील शेवटची वनडे मालिका खेळणाऱ्या कर्णधार एलिसा हिलीनेही अर्धशतकी खेळी केली. तिने ७० चेंडूत ५० धावा केल्या. तसेच ऍनाबेल सुथरलंड ४८ धावा आणि ऍश्लेंग्घ गार्डनंर ५ धावा करत नाबाद राहिल्या.

या मालिकेतील दुसरा वनडे सामना २७ फेब्रुवारीला होबार्टमध्ये खेळला जाणार आहे. तोपर्यंत हरमनप्रीत ठीक होण्याची शक्यता आहे. तसेच मालिकेतील तिसरा सामनाही ही येथेच १ मार्चला खेळला जाणार आहे. या दौऱ्यात एक कसोटी सामनाही खेळला जाणार असून तो ६ मार्चला पर्थमध्ये खेळला जाणार आहे.

Comments are closed.