“आता सन्मानासाठी खेळणार…” पराभवानंतर राजस्थानच्या कर्णधाराची भावूक प्रतिक्रिया

यंदाच्या आयपीएल हंगामातील (IPL 2025) 42वा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध राजस्थान राॅयल्स (RCB vs RR) संघात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने 11 धावांनी शानदार विजय मिळवला. दरम्यान रियान परागच्या (Riyan Parag) नेतृत्वाखालील राजस्थान राॅयल्सने धावांचा पाठलाग करताना चिवट झुंज दिली. पण अखेर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार रियान परागने मोठे वक्तव्य केले आहे.

राजस्थान रॉयल्सचा आयपीएल 2025चा प्रवास आता संपला आहे. हे स्वतः कर्णधार रियान परागने म्हटले आहे. आरसीबीविरूद्ध पराभव झाल्यानंतर परागने कबूल केले की आता त्यांच्या संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता बऱ्याच प्रमाणात संपल्या आहेत. सलग तिसऱ्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना, संघ जवळ येऊनही लक्ष्य गाठू शकला नाही. दबावाखाली, ते पुन्हा एकदा ढेपाळले आणि त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला.

राजस्थान रॉयल्ससमोर या सामन्यात 206 धावांचे लक्ष्य होते. आणि 9.1 षटकात 2 गडी बाद 110 धावा काढल्यानंतर संघ मजबूत स्थितीत होता. परंतु त्यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर त्यांना सामन्यात 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रियान परागने सामन्याच्या प्रेझेंटेशन दरम्यान सांगितले की फलंदाज अपेक्षांनुसार खेळले नाहीत. फलंदाजांनी या पराभवासाठी स्वतःला जबाबदार धरले पाहिजे कारण ते फिरकी गोलंदाजांविरुद्ध सकारात्मक दृष्टिकोन दाखवू शकले नाहीत.

रियान पराग म्हणाला, “आम्ही गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. फलंदाजीतही तेवढी चांगली कामगिरी केली नाही. 10 षटकांनंतर आम्ही मजबूत स्थितीत होतो. पराभवासाठी आम्ही स्वतः जबाबदार आहोत. फिरकीपटूंविरुद्ध आम्ही तो सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला नाही. सपोर्ट स्टाफने आम्हाला खूप स्वातंत्र्य दिले आहे. जबाबदारी आमच्यावर आहे, खेळाडूंनी काही हेतू दाखवणे आणि मोकळेपणाने खेळणे ही त्यांची जबाबदारी आहे. ही अशी स्पर्धा आहे की जर तुम्ही थोडीशी चूक केली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि आजही तसेच घडले.”

पुढे बोलताना पराग म्हणाला की, “आम्ही संघात खूप बोलतो. आम्ही परिस्थितीबद्दल बोललो. पण आज आम्ही खूप मजबूत स्थितीत होतो पण आम्ही सामना निसटू दिला. आता आम्ही सन्मानासाठी खेळू. येथे असे अनेक चाहते आहेत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे आणि आमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आम्ही त्यांच्यासाठी उर्वरित सामने खेळू. या संघासाठी खेळण्यासाठी आम्ही भाग्यवान आणि कृतज्ञ आहोत. पुढच्या वेळी आम्ही मैदानावर पाऊल ठेवल्यावर हे दिसून येईल.”

Comments are closed.