IPL 2026: कॅप्टन ऋतुराजने सीएसकेच्या सलामीच्या जोडीचा केला खुलासा; संजू की आयुष? वाचा सविस्तर

आयपीएल २०२६ च्या तयारीसाठी सर्व संघ जोरदार सराव करत आहे. २८ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या या १९ व्या हंगामासाठी काही संघांनी त्यांच्या खेळाडूंच्या फलंदाजी क्रमांकाबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुल याला सलामीसाठी निश्चित केले आहे, दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) देखील त्यांचे सलामीवीर निश्चित केले आहे.
सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने खुलासा केली की, त्याच्यासोबत डावाची सुरूवात करण्यास संजू सॅमसन येणार आहे. गेल्या हंगामातील सीएसकेची कामगिरी निराशाजनक राहिली होती, त्यामागचे कारण त्यांच्या सलामीवीरांची खराब कामगिरी. त्यांनी सलामी जोडीमध्ये अनेकदा बदल केले मात्र अपयशी ठरले होते. ऋतुराजला २०२५ च्या हंगामात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते. त्यानंतर आयुष म्हात्रेला संधी दिली. त्याने काही डावांमध्ये संघाला चांगली सुरूवात करून दिली, मात्र आयपीएल २०२६ साठी संजूला संघात घेतल्याने सीएसके कोणाला सलामीसाठी उतरवणार याची चर्चा सुरू होती.
मुंबईमध्ये बुधवारी (२५ मार्च) झालेल्या सर्व कर्णधारांच्या बैठकीवेळी ऋतुराजला सीएसकेच्या सलामीजोडीबाबत विचारले गेले आणि त्याने तो संजूसोबत सलामीला येणार, असे सांगितले आहे. त्यामुळे आयुष तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार आहे.
संजूने वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, मात्र सलामीच्या वेळी त्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. भारतासाठी त्याने सलामीला येताना टी२० मध्ये तीन शतके केली आहेत. तसेच नुकतेच पार पडलेल्या टी२० विश्वचषक २०२६ मध्ये त्याचा जबरदस्त फॉर्म दिसला. त्याने संघाला धमाकेदार सुरूवात करून दिली आणि विजेतेपद जिंकण्यात मोठी भुमिका पार पाडली.
Comments are closed.