Captain Shiva Chauhan : सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी – कॅप्टन शिवा चौहान
सियाचीन ग्लेशियर हे जगातील सर्वात उंच युद्ध क्षेत्र आहे. सुमारे 76 किलोमीटरवर पसरलेल्या या भागातील तापमान शून्याच्याही खाली असते. त्यामुळे इथे टिकून राहणे फार कठीण मानले जाते. शिवाय हिमस्खलन, वेगवान वारे आणि स्नो स्लाइड्ससारख्या विविध नैसर्गिक आपत्तींचा इथे सतत धोका असतो. त्यामुळे सियाचीनसारख्या ठिकाणी तैनात होणे आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणेत कार्य करणे अत्यंत आव्हानात्मक मानले जाते. हे आव्हान कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी सक्षमपणे पेलले आणि महिलांच्या क्षमतेची उभ्या जगाला जाणीव करून दिली. तर जाणून घेऊया कोण आहेत कॅप्टन शिवा चौहान आणि त्यांचा रोमांचक प्रवास. (Captain Shiva Chauhan who deployed in Siachen as First woman officer)
शिक्षण आणि कुटुंब
कॅप्टन शिवा चौहान यांचा जन्म राजस्थानमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. एक असे कुटुंब ज्यांनी आपल्या लेकीला लहानपणापासून देशसेवेसाठी प्रेरित केले. त्यामुळे भारतीय लष्कराला एक अभिमानास्पद महिला अधिकारी मिळाली. राजस्थानची लेक कॅप्टन शिवा यांनी आपले शालेय शिक्षण उदयपुरमधून पूर्ण केले. तर उदयपूरच्याच एनजेआर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी सिविल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य शिक्षण संस्थेतून (राष्ट्रीय संरक्षण अकादमी) विज्ञान, नेतृत्व आणि शारीरिक क्षमता वाढवण्याचे प्रशिक्षण घेतले. पुढे आर्मी सीडीएसची (Chief of Defence Staff) परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर 2021 मध्ये त्यांनी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये प्रवेश घेतला.
सर्वोच्च सीमा चौकी ‘कुमार’वर पोस्टिंग
माहितीनुसार, सियाचीन बॅटल स्कूलमध्ये तब्बल एक महिना कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर कॅप्टन शिवा चौहान यांना सियाचीन ग्लेशियरवरील सर्वोच्च सीमा चौकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘कुमार’ पोस्टवर तैनात करण्यात आले. ‘कुमार’ पोस्ट हे 14.5 हजार फुटांवर आहे आणि बाराही महिने हा भाग बर्फाने झाकलेला असतो.
पुरुषांचे नेतृत्व करण्याचे आव्हान
कॅप्टन शिवा भारतीय सैन्यात अधिकारी पदावर कार्यरत होण्यापूर्वी अनेक पर्वतीय युनिट्समध्ये सक्रिय होत्या. त्यांनी कठीण परिस्थितींचा सामना करत विविध पर्वतीय मोहिमा फत्ते केल्या आहेत. दरम्यान, सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्ध क्षेत्रातील पोस्टिंगवेळी त्यांनी सुरा सोई इंजिनियर रेजिमेंटच्या पुरुषांचे नेतृत्व करण्याचे आव्हान पेलले. उत्तम कामगिरीसोबत विविध आव्हानांचा सामना करत त्यांच्या नेतृत्वात सॅपर्सच्या टीमने युद्ध इंजिनिअरिंगच्या कामांची जबाबदारी घेतली. माहितीनुसार, कॅप्टन शिवा यांनी जुलै 2022 मध्ये कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या सियाचीन वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियलपर्यंत 508 किलोमीटरचे अंतर कापून सुरा सोई सायकलिंग मोहिमेचे यशस्वी नेतृत्व केले होते.
हाडं गोठवणाऱ्या थंडीत देशसेवा
सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला कॅप्टन शिवा यांनी धैर्य आणि समर्पणाने भारतीय सैन्यदलाला नवीन दिशा दिली आहे. सियाचीनमध्ये मायनस 21 अंश सेल्सियसपर्यंत तापमान असते. त्यामुळे अंघोळीसाठी पाणी वितळवायला जवळपास 3 तास लागतात. या भागात कायम 3000 च्या आसपास सैनिक कार्यरत असतात. हाडं गोठवणाऱ्या थंडीत हिमनदीचे रक्षण करण्याची जबाबदारी मिळालेला प्रत्येक सैनिक इथे 3 महिने सेवेत असतो. कारण, या हवामानात याहून अधिक काळ कुणीही जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे अशा भागात तैनात होऊन देशसेवा करणे हे स्वतःसोबत केलेले एक युद्ध आहे आणि कॅप्टन शिवासह असे अनेक सैनिक रोज हे युद्ध लढतात, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
भारतीय सैन्याच्या परंपरेत रचला नवा इतिहास
सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात होणारी पहिली महिला अधिकारी म्हणून कॅप्टन शिवा यांना अनेक आव्हानांना आणि जोखमींना सामोरे जावे लागले. त्यांच्या धैर्य, जिद्द आणि नेतृत्वाने भारतीय सैन्याच्या परंपरेत एक नवा इतिहास रचला. कॅप्टन शिवा यांनी महिलाही कोणत्याही क्षेत्रात विशेषतः सैनिक म्हणूनसुद्धा आपली परंपरा आणि कर्तव्य पार पाडू शकतात, हे दाखवून दिले. भारतीय सैन्यदलात एक मजबूत आणि सक्षम अधिकारी अशी ओळख मिळवणाऱ्या कॅप्टन शिवा या अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरल्या. कठीण परिस्थितीतही धैर्य आणि समर्पणाने आपण आव्हाने पार करू शकतो, याचे त्या एक उत्तम उदाहरण आहेत.
हेही पाहा –
Comments are closed.