अभिषेक शर्माच्या फॉर्मवर कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान; प्रतिस्पर्धी संघांना दिला इशारा!

भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये अद्याप साधे खातेही उघडता आलेले नाही. आता स्पर्धेच्या ‘सुपर ८’ फेरीला सुरुवात होत आहे, जिथे सर्वजण त्याच्या फॉर्मबद्दल प्रचंड चिंता व्यक्त करत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेकबाबत मोठे विधान केले आहे. याचसोबत त्याने प्रतिस्पर्धी संघांना आतापासूनच इशारा दिला आहे.

​यूएसए, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध अभिषेक शर्मा एकही धाव न काढता (शून्य धावांवर) पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. अशा परिस्थितीत आता अभिषेकला संघातून डच्चू देण्याची मागणी होऊ लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने अभिषेकची पाठराखण करताना म्हटले की, “मला त्या लोकांची काळजी वाटतेय जे अभिषेक शर्माबद्दल चिंता करत आहेत. मला त्या संघांची जास्त काळजी वाटतेय, ज्यांना भविष्यात त्याचा सामना करावा लागणार आहे. त्याने गेल्या वर्षी सर्व काही (उत्तम कामगिरी) केले आहे, आता वेळ आली आहे की आम्ही देखील त्याच्या पाठीशी उभे राहून त्याची परतफेड करावी.” अभिषेकला सध्या संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा मिळत आहे. आपल्या शानदार कामगिरीमुळेच अभिषेक अजूनही टी-२० क्रमवारीत नंबर १ फलंदाज आहे.

​अभिषेक शर्माने आतापर्यंत धावा केल्या नसल्या तरी टीम इंडियाने सहजपणे सामने जिंकले आहेत, परंतु आता ‘सुपर ८’ ची सुरुवात झाली आहे. जिथे मोठ्या संघांशी सामना होणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. त्यासाठी ईशान किशन आणि अभिषेक या दोघांनाही बॅटने धावा कराव्या लागतील. जर या दोन्ही सलामीवीरांची बॅट तळपली, तर टीम इंडियासाठी विजय खूप सोपा होईल. टिळक वर्माला देखील धावा काढताना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

Comments are closed.