सूर्यकुमार यादवनं जिकलं चाहत्यांच मन, बाद झालेल्या खेळाडूला पुन्हा संधी दिली, पाहा नेमकं काय घडलं…
बुधवारी आशिया कप 2025 च्या दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी युएई संघाचा पराभव केला. युएई संघ पूर्ण षटकेही खेळू शकला नाही. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यात 13.1 षटकांत सर्व विकेट गमावल्यानंतर युएईला फक्त 57 धावा करता आल्या. कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांनी युएईच्या फलंदाजांना थांबण्याची संधीही दिली नाही. युएई संघाने चांगली सुरुवात केली होती पण भारतीय गोलंदाजांसमोर जास्त काळ टिकू शकला नाही. सामन्यादरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने खिलाडूवृत्तीचे उदाहरण मांडले. जे पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
ही घटना युएईच्या डावाच्या 13 व्या षटकात घडली. शिवम दुबेच्या षटकातील तिसरा चेंडू जुनैद सिद्दीकीने खेचला पण चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. मात्र, त्यापूर्वी, गोलंदाज शिवम दुबेचा टॉवेल पंचांसमोर पडला, ज्यामुळे फलंदाजाचे लक्ष विचलित झाले. चेंडू पूर्ण झाल्यानंतर, जुनैदने पंच आणि गोलंदाजांना याबद्दल सांगितले परंतु तोपर्यंत विकेटच्या मागे उभ्या असलेल्या संजू सॅमसनने त्याला स्टंप आउट केले. पंचांनी तपासणी केली तेव्हा जुनैद क्रीजच्या बाहेर उभा होता आणि टॉवेलकडे बोट दाखवत होता.
अंपायरने जुनैद सिद्दीकीला बाद दिले होते पण भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अपील मागे घेतले. कारण त्यांना वाटले की टॉवेल पडल्यामुळे युएईचा फलंदाज विचलित झाला आहे आणि त्यामुळे तो क्रीजच्या बाहेरच राहिला. पंचांनी सूर्यकुमारच्या मताशी सहमती दर्शवली आणि युएईच्या फलंदाजाला नाबाद ठरवले. सूर्यकुमारच्या खेळाच्या भावनेचे कौतुक केले जात आहे. मात्र, जुनैद संधीचा फायदा घेऊ शकला नाही आणि पुढच्याच चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तो झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने त्याचा झेल टिपला. जुनैद सिद्दीकीला खाते उघडता आले नाही.
भारताने आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या ग्रुप अ सामन्यात संयुक्त अरब अमिरातींना 13.1 षटकांत 57 धावांत गुंडाळले. युएईकडून फक्त अलिशान शराफू (22 धावा) आणि मोहम्मद वसीम (19 धावा) दुहेरी आकडा गाठू शकले. कुलदीप यादवने 2.1 षटकांत सात धावांत चार बळी घेतले, तर शिवम दुबेने दोन षटकांत चार धावांत तीन बळी घेतले.
Comments are closed.