भावनांची वैश्विक भाषा सिनेमा; मानवतेला एकत्र जोडण्याचे सामर्थ्य : कार्ला सोफिया गॅस्कॉन – TMarathiNews

पणजी  : सिनेमा हा केवळ मनोरंजनाचा माध्यम नसून भौगोलिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून मानवी भावनांच्या वैश्विक भाषेतून लोकांना एकत्र जोडणारा प्रभावी दुवा आहे, असे प्रतिपादन प्रख्यात अभिनेत्री कार्ला सोफिया गॅस्कॉन यांनी केले. गोव्यात सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आयोजित ‘स्टेजेस अक्रॉस बॉर्डर्स’ या विशेष मास्टरक्लासमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी अभिनयकलेतील विविध पैलू, सर्जनशीलता आणि चित्रपट निर्मितीतील सामूहिक योगदानावर प्रकाश टाकला.

या मास्टरक्लासमध्ये गॅस्कॉन यांनी अभिनय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ध्यास, समर्पण आणि स्वतःवरील विश्वास किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट केले. नवोदित कलाकारांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार करावा आणि आपल्या कलेप्रती निष्ठा ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. अस्सल अभिनय साकारण्यासाठी कलेवर मनापासून प्रेम असणे आणि प्रत्येक भूमिकेशी भावनिक पातळीवर जोडले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

पडद्यावर प्रभावी आणि अस्सल अभिनय साकारण्यासाठी आपण प्रत्येक भूमिकेत पूर्णपणे समरस होण्याचा प्रयत्न करतो, असे त्यांनी सांगितले. पारंपरिक चौकटीबाहेरील आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याकडे आपला अधिक कल असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतःच्या अनुभवांपेक्षा वेगळ्या भूमिका साकारल्याने कलाकाराला नवे सर्जनशील अनुभव मिळतात. त्यातून कलात्मक विकासासोबतच स्वतःकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.

अभिनय हा आव्हाने आणि नव्या शोधांचा सातत्यपूर्ण प्रवास आहे. प्रत्येक भूमिका कलाकाराकडून वेगळ्या दृष्टिकोनाची आणि नव्या पद्धतीने विचार करण्याची अपेक्षा ठेवते, असे गॅस्कॉन यांनी अधोरेखित केले. सिनेमा हा भाषा, संस्कृती आणि भौगोलिक सीमा यांच्या पलीकडे जाऊन समान मानवी भावनांच्या माध्यमातून प्रेक्षकांना जोडतो. त्यामुळे चित्रपट हे जगभरातील लोकांना एकत्र आणणारे प्रभावी माध्यम ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

चित्रपट निर्मिती ही केवळ एका व्यक्तीची कलाकृती नसून संपूर्ण चमूच्या सामूहिक प्रयत्नांतून साकार होणारी प्रक्रिया आहे, असेही त्यांनी सांगितले. दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मिती प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे योगदान चित्रपटाच्या अंतिम स्वरूपासाठी महत्त्वाचे असते. चित्रपट हा संपूर्ण चमूच्या सामूहिक दृष्टिकोनातून आणि सर्जनशील प्रयत्नांतून आकाराला येतो, असे त्यांनी नमूद केले.

या मास्टरक्लासमुळे नवोदित कलाकार, चित्रपट निर्माते आणि चित्रपटप्रेमींना अभिनयातील बारकावे, सर्जनशील प्रक्रिया आणि चित्रपट निर्मितीतील सामूहिक कार्याचे महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळाली. इफ्फीच्या माध्यमातून जागतिक चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकारांचे अनुभव आणि विचार जाणून घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे या सत्रातून पुन्हा अधोरेखित झाले.

Comments are closed.