Ratnagiri News – संगमेश्वरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नराधमाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील पोचरी गावामध्ये एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. गावात आपल्या घरामध्ये एकटी असलेल्या एका निष्पाप अल्पवयीन मुलीच्या एकांताचा गैरफायदा घेत तिच्याशी अश्लील गैरकृत्य करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोचरी गावासह संपूर्ण फुणगूस खाडी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जून 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी घरामध्ये एकटीच होती. याच संधीचा गैरफायदा एका संशयित नराधमाने घेतला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या गंभीर आणि निंदनीय प्रकारानंतर पीडितेच्या कुटुंबाने 3 जून रोजी रात्री संगमेश्वर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीवरून संगमेश्वर पोलिसांनी तातडीने पावले उचलत संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 74 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) 2012 चे कलम 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी तात्काळ पोचरी गावातील घटनास्थळाला भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक डी. साळवी करत आहेत. चिमुरड्यांवर वाकडी नजर ठेवणाऱ्या अशा नराधमांना पोलिसांनी कठोरात कठोर शिक्षा करावी, असा सूर आता सर्वसामान्यांमधून उमटत आहे.
Comments are closed.