नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल

चार महिन्यांपासून धुळीने माखलेले कापड आणि प्लास्टिकच्या आवरणात बंद असलेल्या नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे रविवारी अनावरण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनावरण होऊन 24 तास उलटत नाही तोच हा पुतळा पालिका प्रशासनाने पुन्हा झाकून ठेवल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नेरुळ येथील सेक्टर 1 मधील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे काम गेल्या चार महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. तेव्हापासून हा पुतळा कापड आणि प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवण्यात आला होता. पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी या पुतळ्याचे अनावरण केले. हा कार्यक्रम बेकायदा ठरवून नेरुळ पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान शिवरायांच्या पुतळ्याचे काम जरी पूर्ण झाले असले तरी पुतळ्याच्या परिसरातील भागाचे सुशोभिकरण बाकी आहे.

शिवसैनिक, मनसैनिकांनी कडे तोडले

पुतळ्याचे अनावरण होऊ नये यासाठी पोलिसांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याभोवती कडे केले होते. मात्र शिवसैनिक आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हे कडे तोडून पुतळ्याच्या परिसरात प्रवेश केला. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. सत्ताधाऱ्यांचा दबाव झुगारून अमित ठाकरे यांनी पुतळ्यावर जलाभिषेक करून धुळीने माखलेला पुतळा धुऊन काढला. पुष्पहार अर्पण करून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवण्यात आला होता. महाराजांचा हा अपमान अमित ठाकरे यांना सहन न झाल्यामुळे त्यांनी पुतळ्यावरील कापड काढून अनावरण केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा सन्मान राखणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे, असेही फटकारे आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावले.

Comments are closed.