'वंदे मातरम'चा अपमान केल्याप्रकरणी सोनिया गांधींवर गुन्हा दाखल.
मंगळूरमध्ये एफआयआर : काँग्रेसकडून खुलासा, भाजपकडून माफीची मागणी, आरोप-प्रत्यारोप शिगेला
वृत्तसंस्था/ बेंगळूर, नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिनी काँग्रेसच्या मुख्यालयात ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. हा वाद वाढत गेल्याने भाजपने काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात मंगळूरमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार कर्नाटकातील उरवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने याबाबत खुलासा केला असला तरी भाजपने मात्र सोनिया गांधी यांनी देशवासियांची माफी मागायला हवी, अशी मागणी तीव्रपणे लावून धरली आहे.
15 ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनी काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान वंदे मातरम् हे राष्ट्रगती वाजत असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आपापसात बोलत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपने याला राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’चा अपमान असल्याचे म्हटले आहे. ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण देणारा नवीन कायदा संसदेने नुकताच मंजूर केला असतानाच त्याभोवतीचा हा वाद निर्माण झाला आहे. या कायद्यानुसार, ‘वंदे मातरम्’ला ‘जन गण मन’ इतकेच कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. राष्ट्रगीतासंबंधी 29 जुलै रोजी एक नवीन कायदा मंजूर करण्यात आल्यानुसार ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि आर्थिक दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान सोनिया गांधींनी ‘वंदे मातरम्’ गाणे थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पक्षाने या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. कार्यक्रमादरम्यान संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायले जात होते. पहिल्या काही ओळींनंतर सोनिया अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी राष्ट्रगती थांबवण्याचा इशारा केला. भाजपने ‘एक्स’वर यासंबंधी ट्विट केले आहे. राष्ट्रगीत सुरू असताना राहुल गांधीसुद्धा अस्वस्थ दिसत असल्याचे भाजपने म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने भाजपचे आरोप फेटाळून लावले असून, सोनिया गांधींनी ‘वंदे मातरम्’ थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी खुर्ची मागत होत्या, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले आहे.
संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे गायन : जयराम रमेश
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी काँग्रेसची बाजू मांडताना ‘वंदे मातरम्’ थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नसल्याचे सांगितले. कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष बराच वेळ उभे असल्यामुळे सोनिया गांधी त्यांच्यासाठी खुर्ची आणायला सांगत होत्या. काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम्’ पूर्णपणे गायले गेले आणि ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. सोनियांच्या कृतीचा अर्थ ‘वंदे मातरम्’ थांबवण्याचा प्रयत्न असा लावणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसने देशाची माफी मागावी : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी राजस्थानमधील निंबाहेरा येथे ‘वंदे मातरम्’ अपमानाच्या मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले. मतपेढीच्या लालसेपोटी काँग्रेस ‘वंदे मातरम्’ विसरली असल्याचा आरोप करत या घटनेबद्दल काँग्रेस पक्षाने देशातील जनतेची माफी मागावी, असे ते म्हणाले. काँग्रेस मुख्यालयात झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचा संदर्भ देत अमित शाह यांनी काँग्रेस नेत्यांमध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर त्यांनी हात जोडून बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या अमर आत्म्याची आणि देशातील जनतेची माफी मागावी, असे स्पष्ट केले.
मनोज तिवारी यांचाही काँग्रेसवर हल्लाबोल
भाजप खासदार मनोज तिवारी यांनी या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस पक्षाने देशाला आपला खरा चेहरा दाखवला आहे. त्यांना ‘वंदे मातरम्’चा तिरस्कार आहे. सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना ‘वंदे मातरम्’ ऐकून अस्वस्थ वाटले असे आरोप तिवारी यांनी केले आहेत. याचवेळी त्यांनी वंदे मातरम्च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून वंदे मातरम्चा सन्मान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.
Comments are closed.