छावाच्या कार्यकर्त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारणाऱ्या सुरज चव्हाणांवर अखेर गुन्हा दाखल, शोधासाठी
सूरज चवन: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधीमंडळात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या समोर तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उधळले. या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचे दिसून आले. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तर या कृत्याच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूर बंदची हाक दिली आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर शहरातील विवेकानंद पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक, असे दोन पथके सुरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. जोपर्यंत सुरज चव्हाणांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असे भूमिका छावा संघटनेने घेतली आहे.
सुरज चव्हाणांची प्रतिक्रिया
दरम्यान, कालच्या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांनी आज सकाळी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत दिलगिरी व्यक्त केली आहे. सुरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, कालच्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच विजय घाडगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्यातून सूरज चव्हाण यांना वगळल्याची माहिती समोर आली. सूरज चव्हाण यांच्या मारहाणीनंतर छावाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. याचा फटका सुनील तटकरे यांच्या दौऱ्याला बसत आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी खबरदारी म्हणून सूरज चव्हाण यांना आपल्या दौऱ्यातून वगळल्याची माहिती समोर आली आहे. तर सुरज चव्हाण यांच्याकडून माझे बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे आपण लातूरमध्ये राहून उपचार घेणार आहे, असे सांगण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=ogeujep1jrw
इतर महत्त्वाच्या बातम्या
लातूर मारहाण प्रकरण! विजय घाटगेंना मारहाण करणारा सूरज चव्हाण कोण? जाणून घ्या सविस्तर माहिती
आणखी वाचा
Comments are closed.