भाजपच्या चिमूर तालुका मंडळाध्यक्षावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. भाजपचे चिमूर तालुका मंडळाध्यक्ष तथा सातारा गावचे राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त माजी सरपंच गजानन गुडधे यांच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी आणि तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर सायंकाळी चिमूर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात पीडित कुटुंबीयांनी राजकीय दबाव आणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. तर आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्या सातारा गावातील गजानन गुडधे हे माजी सरपंच असून, सध्या भाजपच्या चिमूर तालुका मंडळाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. अकरावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीशी त्यांनी मागील अनेक महिन्यांपासून मोबाईलवर अश्लील स्वरूपाचे संभाषण केल्याचा तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पीडित मुलगी आणि तिच्या आईने चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(४) सह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

दरम्यान, या प्रकरणात पीडित कुटुंबावर राजकीय दबाव आणण्यात आला आणि प्रकरण दडपण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरोपीला स्थानिक सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा दावा करत, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव येऊ शकतो, अशी भीती काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी आरोपीला पाठीशी घालू नये, अन्यथा काँग्रेसच्या वतीने चिमूर येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवानी वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गजानन गुडधे यांच्याविरुद्ध पोक्सो कायदा तसेच लैंगिक अत्याचारासंदर्भातील भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी सांगितले.

Comments are closed.