हिंदुस्थानी तरुणांना म्यानमारमध्ये ‘सायबर गुलाम’ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! मुंबईचा ‘एजंट’ CBIच्या जाळ्यात
हिंदुस्थानच्या तरुणांना परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दावून त्यांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा CBI ने पर्दाफाश केला आहे. थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून हिंदुस्थानी तरुणांना म्यानमारमधील सायबर फसवणूक केंद्रांमध्ये गुलाम म्हणून विकण्याचे काम करत असल्याचा खळबळजनक आरोप आहे. या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुनील नेल्लातू रामकृष्णन उर्फ ‘क्रिश’ याला मुंबई विमानतळावर उतरताच अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सीबीआय त्याच्यावर पाळत ठेवून होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हे रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात होते. आरोपी सुनील प्रथम तरुणांना बँकॉकला पाठवायचा आणि तिथून चोरट्या मार्गाने म्यानमारमधील ‘केके पार्क’ (KK Park) सारख्या धोकादायक सायबर कंपाऊंड्समध्ये त्यांची रवानगी केली जात असे. तिथे पोहचल्यावर या तरुणांचे पासपोर्ट काढून घेतले जायचे आणि त्यांना एका प्रकारे बंदिस्त करून ठेवले जात असल्याची माहिती आहे.
या ‘सायबर गुन्हेगारीच्या अड्ड्यांमध्ये’ हिंदुस्थानी तरुणांना जबरदस्तीने डिजिटल अरेस्ट, रोमान्स फ्रॉड आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळे करण्यासाठी भाग पाडले जात होते. जर एखाद्या तरुणाने काम करण्यास नकार दिला, तर त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. त्यांच्या हालचालींवर कडक निर्बंध लावून त्यांना सतत दहशतीखाली ठेवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
मार्च आणि नोव्हेंबर 2025 मध्ये थायलंडमधून सुटका होऊन हिंदुस्थानात परतलेल्या पीडितांच्या जबाबावरून या मोठ्या घोटाळ्याचा उलगडा झाला. सुनीलच्या अटकेनंतर त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात म्यानमार आणि कंबोडियामधील तस्करीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण डिजिटल पुरावे सीबीआयच्या हाती लागले आहेत. या टोळीचे जाळे अजून किती खोलवर पसरले आहे, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.
Comments are closed.