करुर चेंगराचेंगरी प्रकरणात सीबीआय चौकशी

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश : टीव्हीकेची याचिका मंजूर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

तामिळनाडूच्या करूरमध्ये अभिनेता-राजकीय नेता विजयच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी तमिलगा वेत्रि कझगम (टीव्हीके) पक्षाने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करत सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाच्या देखरेखीत व्हावी, कारण ताळिनाडू पोलिसांकडून स्थापन विशेष तपास पथकावर जनतेचा भरवसा नसेल असे टीव्हीकने याचिकेत म्हटले होते. चेंगराचेंगरी पूर्वनियोजित कटाचा हिस्सा असू  शकतो असेही पक्षाने म्हटले आहे.

टीव्हीकेच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश अजय रस्तोगी यांना करूर चेंगराचेंगरीप्रकरणी सीबीआय चौकशीची देखरेख करणाऱ्या समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. या समितीत तामिळनाडू कॅडरचे दोन आयपीएस अधिकारी सामील केले जाऊ शकतात. सीबीआय अधिकारी दर महिन्याला तपासाच्या प्रगतीचा अहवाल या समितीकडे सोपवतील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. टीव्हीकेचे सचिव आधव अर्जुना यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन केली होती, या निर्णयाला टीव्हीकेने आव्हान दिले होते.

टीव्हीकेच्या अनेक सदस्यांवर एफआयआर

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर वाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. करूर पोलिसांनी एफआयआर नेंदवून टीव्हीकेचे करूर (उत्तर) जिल्हा सचिव माधियाझगन, महासचिव बसी आनंद आणि संयुक्त महासचिव सीटीआर निर्मल कुमार विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न आणि इतरांचा जीव जोखिमीत टाकण्यासारखे गंभीर आरोप केले होते. विजय रॅलीत उशिरा पोहोचले होते आणि लोक अनेक तासांपासून त्यांची प्रतीक्षा करत होते असे पोलिसांचे सांगणे आहे.

चेंगराचेंगरी कशामुळे घडली?

विजय यांच्या विशेष रॅली बसला निर्धारित स्थानापासून कमीतकमी 50 मीटरपूर्वी रोखण्याची सूचना पोलिसांनी आयोजकांना केली होती. परंतु आयोजकांना निर्धारित ठिकाणीच बस उभी केली होती. 10 मिनिटांपर्यंत विजय बसमधून बाहेर न आल्याने लोकांची गर्दी नाराज झाली, लोक त्यांना पाहण्यासाठी आतुर झाले होते. विजय यांना पाहण्याच्या चढाओढीतून चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे पोलिसांचे सांगणे आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला होता.

अटींचे पालन न केल्याचा आरोप

या रॅलीसाठी टीव्हीकेने 10 हजार लोकांसाठी अनुमती मागितली होती, परंतु रॅलीत सुमारे 25 हजार लोक जमा झाले होते. पक्षाने पुरेसे पाणी, सुरक्षा आणि अन्य व्यवस्था केली नव्हती. तसेच अनुमतीच्या अटींचे पालन केले नव्हते असे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments are closed.