भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआय मोठी कारवाई करते
सरकारी कंपनीच्या जीएम, डीजीएमला अटक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सीबीआयने पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (पीजीसीआयएल) वरिष्ठ महाव्यवस्थापक (जीएम) उदय कुमार आणि केईसी इंटरनॅशनल लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (डीजीएम) सुमन सिंह यांना लाच घेताना अटक केली आहे. केईसी इंटरनॅशनलचे अधिकारी सुमन सिंह यांनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याला कंत्राटाशी निगडित बिल मंजूर करण्यासाठी लाच दिली होती.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे अधिकारी हे केईसी इंटरनॅशनलच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून कंत्राटाशी निगडित बिलं मंजूर करण्याच्या बदल्यात लाच घेत होते अशी माहिती सीबीआयला मिळाली होती. सीबीआयने 19 मार्च रोजी गुन्हा नोंदवून घेत तपास सुरु केला होता. सापळा रचून सुमन सिंहने उदय कुमारला 2.4 लाख रुपयांची लाच देताच पथकाने त्वरित दोघांना अटक केली आहे. अटकेनंतर सीबीआयने सीकर, जयपूर आणि मोहाली येथे आरोपींच्या ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान महत्त्वपूर्ण दस्तऐवज, डिजिटल उपकरणे आणि अन्य आक्षेपार्ह सामग्री हस्तगत करण्यात आली आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अधीन एक सरकारी कंपनी आहे. तर केईसी इंटरनॅशनल लिमिटेड ही खासगी कंपनी असून ती पायाभूत अन् वीजवितरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
Comments are closed.