सीडीएस अनिल चौहानला विस्तार मिळतो

2026 पर्यंत पदावर राहणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ वाढवला आहे. संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ वाढवण्यास मान्यता दिली. ते आता 30 मे 2026 पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत सीडीएस आणि लष्करी व्यवहार विभागाचे सचिव (डीएमए) म्हणून काम पाहणार आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये जनरल अनिल चौहान यांची देशाचे दुसरे सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

केंद्र सरकारने जनरल बिपिन रावत (दिवंगत) यांच्यानंतर देशाचे दुसरे सीडीएस म्हणून जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती केली होती. उत्तराखंडमधील पौरी येथील रहिवासी अनिल चौहान यांनी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. लेफ्टनंट जनरल चौहान मे 2021 मध्ये ईस्टर्न कमांडच्या चीफ ऑफ स्टाफ पदावरून निवृत्त झाले. त्यांनी विविध आर्मी कमांड, स्टाफ आणि सपोर्ट पदांवर काम केले आहे. तसेच जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दहशतवादविरोधी मोहिमा राबविण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक यांच्यासह विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

Comments are closed.