पहिल्याच पावसात नवीन बस स्थानकाचे सिलिंग कोसळले, निकृष्ठ कामामुळे प्रवाशांचा संताप

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील हायटेक बस स्थानक बांधकामातील भोंगळपणा संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. सध्या एकामागून एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने या बस स्थानकाचे सिलिंग कोसळल्याची घटना घडली. इतक्या तकलादू पद्धतीने हे सिलिंग लावले गेले की, पहिल्याच पावसात त्याची वासलात लागली.

मागील आठवड्यात याच बस स्थानकातील स्वच्छतागृहातील नळाच्या तोट्या, दारे तुटलेल्या स्थितीत दिसून आले होते. त्यावर पांघरूण घालताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले असतानाच काल सिलिंग कोसळले. त्यामुळे हायटेक म्हणून संबोधल्या गेलेल्या बस स्थानकाचा दर्जा काय असेल, याचा प्रत्यय येतो. केवळ लिपापोती करून कंत्राटदाराने हात धुवून घेतल्याचे यात दिसून येते. भाजप आमदार कीर्ती भांगडिया यांच्या पुढाकाराने बांधल्या गेलेल्या या कोट्यवधींच्या स्थानकाचे लोकार्पण होताच तीनतेरा वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे ते पुढे किती काळ टिकेल, हा प्रश्नच जनतेसमोर उभा राहिला आहे.

Comments are closed.