अबब….. थोरांदळेत हनुमान जयंती निमित्त तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणीचा महाप्रसाद तयार…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अनेक वर्षाची परंपरा राखत थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे हनुमानजयंती निमित्त महाप्रसादासाठी तब्बल तीन लाख पुऱ्या पाच पिंप गुळवणी व 1 हजार किलो कांद्यांची चटणी असा महाप्रसाद तयार झाला आहे. गुरुवार (दि. 2) रोजी हनुमान जन्मोत्सवानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.

थोरांदळे येथील हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो. येथील वैशिष्ट्य म्हणजे पुऱ्या गुळवणीचा महाप्रसाद. दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त ग्रामस्थ एकत्र येऊन हा आगळावेगळा पुऱ्या गुळवणीचा महाप्रसाद तयार करतात. याची तयारी आठ दिवस अगोदरच सुरू होते. जवळपास 50 ते 60 वर्षांची या महाप्रसादाची परंपरा असल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. यंदा ग्रामस्थांनी मानसी एक आठवा गहू व उंबऱ्या मागे अडीच किलो गहू गोळा करून तो एकत्र केला नंतर तो प्रत्येक घरोघरी वाटप करण्यात आला. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी बुधवारी (दि. 1) रोजी सकाळी 11 वाजता गावातील हनुमान मंदिरासमोर गावातील सर्व महिला एकत्र आल्या त्यांनी पुऱ्या लाटण्यास सुरुवात केली. महिलांनी पुऱ्या लाटण्याचे काम केले. गावातील पुरुष वर्गाने पुऱ्या तळण्याचे काम केले तर ज्येष्ठ नागरिकांनी कांदे चिरण्याचे काम केले. थोरांदळे गावात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गुरुवारी (दि. 2) रोजी सकाळी सूर्योदयावेळी हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे. यावेळी ह भ प विलास महाराज मिंडे यांचे हनुमान जन्माचे किर्तन होणार आहे. त्यानंतर शेरनी वाटप होऊन उपस्थित भाविकांना पुऱ्या गुळवणीचा महाप्रसाद वाटण्यात येणार आहे. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पुणे मुंबई येथील भाविक भक्त तसेच राज्यातून देखील अनेक भाविक भक्त येत असतात.
या आगळ्यावेगळ्या परपरेनुसार चालणाऱ्या महाप्रसादाची परंपरा आजही ग्रामस्थांनी टिकून ठेवली आहे.

Comments are closed.