लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीतील सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी

स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा अधिक तीव्र व्हावा या उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. लोकमान्य टिळकांचा जन्म झाला त्या रत्नागिरी शहरातील मधल्या आळीतील म्हणजेच टिळक आळीतही त्याच प्रेरणेतून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. त्या गणेशोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. टिळक आळी सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामागे धार्मिकतेपेक्षा सामाजिक व राजकीय जागृतीचे उद्दिष्ट होते. त्याच प्रेरणेने रत्नागिरीतील टिळक आळीतील कार्यकर्त्यांनी 11 सप्टेंबर 1926 रोजी “लोकमान्य टिळक संघ” या नावाने गणेशोत्सव सुरू केला. सुमारे 1952 नंतर या उत्सवाला “टिळक आळी गणेशोत्सव” अशी नवी ओळख मिळाली. त्या काळातील वामनराव केळकर, दिनकरअण्णा जोगळेकर, डॉ. जोगळेकर, शेवडे मास्तर, लखुनाना गोगटे, दत्तोपंत आगाशे, विष्णूपंत जोगळेकर, बापू व तात्या परांजपे, ना. ग. काळे, दिगंबरकाका जोशी, नारायणराव व विसुभाऊ लिमये अशा अनेक थोर कार्यकर्त्यांनी हा उत्सव रोवला. दत्तोपंत आगाशे हे पहिले अध्यक्ष झाले.

1928 साली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे पहिले व्याख्यान याच मंडळात झाले. पुढे ते रत्नागिरीत वास्तव्य करीत असताना गणेशोत्सवातील व्याख्यानमालेचा प्रारंभ नेहमी त्यांच्या भाषणानेच होत असे. त्यानंतर रामभाऊ राजवाडे, प्राचार्य जावडेकर, डॉ. किबे, कवी माधव ज्युलियन, पुरुषोत्तम मंगेश लाड, न्यायमूर्ती रानडे, प्रा. वर्दे, यशवंत पाथक, प्रा. शिवाजीराव भोसले यांसारख्या विद्वानांनी प्रबोधनपर व्याख्यानांतून समाजजागृती केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात प्रभातफेरी, स्वदेशी कापडविक्री, चहा सोडण्याच्या शपथा, सहभोजन, धनुष्यबाण व पोहण्याच्या स्पर्धा या उपक्रमांतून राष्ट्रीय वृत्ती जोपासली गेली. उत्सव केवळ भक्तीपुरता मर्यादित न राहता तो समाजक्रांतीचा दीपस्तंभ ठरला. आज बदलत्या काळानुसार समाजप्रबोधनाच्या विषयांतही विविधता आली आहे. नुकत्याच वर्षी डॉ. अक्षय फाटक यांचे सायबर सेक्युरिटीवरील व्याख्यान आयोजित करून मंडळाने आधुनिक जाणिवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

शताब्दी वर्षाचे विशेष उपक्रम

शताब्दी वर्षानिमित्त उत्सवाची सुरुवात 13 ऑक्टोबर 2024 रोजी अथर्वशीर्ष पठणाने झाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या 37 दिवसांत १,११,१११ आवर्तन पूर्ण करून भक्तीचे नवे पर्व घडवले. भगिनींनी प्रेमाने केलेल्या १०,००० मोदकांच्या हवनातून २७ नोव्हेंबर २०२४ रोजी महागणेश याग संपन्न झाला. याशिवाय दशावतार,संगीत बावनखणी,एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा व्यवसायिक प्रयोग,आरोग्य शिबीर,रक्तदान शिबीर असे विविध उपक्रम राबण्यात आले आहेत.गणेशोत्सवातही नाटक,संगीत मैफिली,भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Comments are closed.