रेल्वे मंत्रालयाचा महाराष्ट्रावर घोर अन्याय, रत्नागिरी पॅसेंजर दादरमधून हद्दपार; ‘गोरखपूर’ एक्स्प्रेसला पायघड्या!
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला ठेंगा दाखवत मध्य रेल्वेने त्याजागी उत्तर प्रदेशच्या प्रवाशांसाठी ‘दादर-गोरखपूर’ ट्रेन कायमस्वरूपी सुरू केली आहे. कोकणवासीयांची गैरसोय दूर करण्याऐवजी ‘यूपी’च्या गाडीचा मार्ग मोकळा करण्याच्या मध्य रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे मंत्रालय, भाजप सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटली आहे.
तब्बल 30 वर्षे कोकणवासीयांच्या सेवेत धावणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर कोरोना काळात बंद करण्यात आली. ही गाडी दिव्यापर्यंत चालवली जात आहे. मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी ती गाडी पूर्ववत चालवण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि विविध प्रवाशी संघटना रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या मागणीला न जुमानणाऱया मध्य रेल्वेने ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’च्या जागी ‘दादर-गोरखपूर’ ट्रेन कायमस्वरूपी सुरू केली आहे. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर तत्काळ सुरू न केल्यास ‘महाराष्ट्र दिनी’ तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा ‘जल फाऊंडेशन’चे अध्यक्ष नितीन जाधव यांनी दिला. रेल्वे मंत्रालयाने दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या मागणीला केराची टोपली दाखवली आणि गोरखपूर ट्रेन सुरू केली. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकारचा महाराष्ट्रावरील आकस यातून उघड झाला आहे, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिली.
भाजप खासदाराची मर्जी राखली
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाजपचे खासदार रवी किशन यांच्या मर्जीखातर रेल्वे मंत्र्यांनी ‘यूपी’च्या प्रवाशांच्या सोयीसाठी ‘दादर-गोरखपूर’ ट्रेन तत्काळ आणि कायमस्वरुपी सुरू केली आहे. यातून भाजप सरकारचा दुजाभाव उघड झाला आहे. यावर जोरदार टीका झाल्यानंतर मध्य रेल्वेने ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’मुळे लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडत असल्याचे धक्कादायक स्पष्टीकरण दिले आहे.
कोरोना काळात दिवा स्थानकातून सुरू केली होती गाडी
कोरोना काळात ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ बंद करून ती गाडी दिवा रेल्वे स्थानकातून ‘दिवा-रत्नागिरी पॅसेंजर’ म्हणून चालवली जात आहे. कोरोनापूर्वी ‘दादर-रत्नागिरी’ पॅसेंजर दररोज दादर स्थानकातून दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी सुटायची. आता तीच गाडी दिवा स्थानकातून सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी सोडली जात आहे. ‘रत्नागिरी पॅसेंजर’साठी दादर स्थानकात जागा उपलब्ध नसल्याचे कारण मध्य रेल्वे देत आहे. मात्र त्याच वेळेदरम्यान दादर स्थानकातून ‘दादर-बलिया’, ‘दादर-गोरखपूर’ या गाडया सोडल्या जात आहेत. गोरखपूर ट्रेन दादर स्थानकातून दुपारी 2 वाजून 05 मिनिटांनी सुटते.
Comments are closed.