8 वर्ष 43 दिवसांनंतर शाई होपची शतकी खेळी, अनपेक्षित रेकॉर्ड बुकमध्ये नावाची नोंद
वेस्ट इंडीजच्या शाई होपला (Shai Hope) 8 वर्षांनंतर शतक झळकवण्याचा आनंद मिळाला आहे. त्याने भारताविरुद्ध दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात 103 धावा केल्या. हे त्याच्या 43 कसोटी सामन्यांतील तिसरं शतक आहे. प्रत्यक्षात कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे शेवटचे शतक 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध आले होते. शाई होपने जॉन कॅम्पबेलसह 177 धावांची भागीदारी केली, ज्याच्या जोरावर वेस्ट इंडीजने दुसऱ्या डावात 390 धावा केल्या.
शाई होपने मे 2015 मध्ये इंग्लंडविरुद्ध आपलं कसोटी पदार्पण केलं होतं. त्याच्या कसोटी करिअरमधील पहिले आणि दुसरे शतक एका सामन्यात आले. ऑगस्ट 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 147 धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद 118 धावा केल्या. त्यानंतर 58 डावांपर्यंत होप शतकी खेळी करू शकला नव्हता.
आता 8 वर्ष आणि 43 दिवसांनंतर त्याने भारताविरुद्ध दिल्ली कसोटीत शतक झळकावून शतकाची उणीव भरून काढली आहे. त्याने 214 चेंडू खेळून 103 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 2 षट्कार होते. या शतकासह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजसाठी आठव्या क्रमांकाचा सर्वाधिक शतक करणारा खेळाडू ठरला आहे. होपच्या आत्तापर्यंत 236 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 22 शतक झाले असून त्याने 21 शतक असलेला रिचर्ड रिचर्डसनला मागे टाकले.
शाई होपने या सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 9000 धावांचा टप्पा पार केला. 236 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याच्या एकूण धावा 9,094 झाल्या आहेत. या सर्व कामगिरीमध्ये त्याला एक अनपेक्षित रेकॉर्डही मिळाला. शाई होप वेस्ट इंडीजचा असा पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने दोन कसोटी शतकांदरम्यान सर्वात जास्त सामने खेळले. त्याचे हे शतक 58 डावानंतर आले. आधी हा रेकॉर्ड जर्मेन ब्लॅकवुडच्या नावावर होता, ज्यांनी दोन शतकांदरम्यान 47 सामने खेळले होते.
Comments are closed.