राममंदिरासाठी सीईओची नियुक्ती करावी!

समिती अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांचे वक्तव्य : भाविकांचा विश्वास महत्त्वाचा

वृत्तसंस्था/अयोध्या

अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये देणगीतून जमा होणारी रक्कम काही पदाधिकाऱ्यांनी हडपल्याचे समोर आले असून याप्रकरणी एसआयटीकडून तपास करण्यात येतोय. याचदरम्यान राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी राम मंदिर ट्रस्टच्या कामकाजाला सांभाळण्यासाठी स्वतंत्र सीईओची नियुक्ती केली जावी असा सल्ला दिला आहे. या पदावर एखाद्या माजी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून मंदिर व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार होऊ शकेल, असे मिश्र यांनी म्हटले आहे.

राम मंदिरात पारदर्शकता आणि भाविकांचा विश्वास सर्वोपरि आहे. मंदिरातील दान आणि देणगीशी निगडित कथित घोटाळ्यामुळे मोठे दु:ख झाले. राम मंदिर सनातन धर्माचे एक आंतरराष्ट्रीय प्रतीक असून याचे व्यवस्थापन जगातील कुठल्याही अन्य मंदिरापेक्षा अधिक उत्कृष्ट व्हायला हवे. सर्वात मोठे आव्हान भाविकांची सुविधा सुनिश्चित करणे आहे आणि मंदिराचे व्यवस्थापन परंपरेनुसार केले जातेय हा विश्वास कायम राखणे असल्याचे नृपेंद्र मिश्र यांनी म्हटले.

छोट्या जिल्ह्यासारखे व्यवस्थापन

71 एकरमध्ये फैलावलेल्या मंदिर परिसरातील घडामोडी एखाद्या छोट्या जिल्ह्यासमान आहेत, जेथे प्रतिदिन जवळपास 1 लाख भाविक दर्शनासाठी येतात. इतक्या मोठ्या संख्येत लोकांच्या आवश्यकता आणि व्यवस्था सांभाळणे सोपे काम नाही. ट्रस्टच्या उपनियमांमध्ये पूर्वीच एका व्यवस्थापन समितीची तरतूद आहे, ज्याचे अध्यक्ष महासचिव चंपत राय आहेत. अशास्थितीत या समितीत  स्वतंत्र सीईओला सामील केल्यास नियमांचे उल्लंघन होणार नसल्याचा दावा मिश्र यांनी केला आहे.

तपास सुरू

भूमी खरेदी आणि देणगीशी निगडित तक्रारींप्रकणी एक विशेष तपास पथक  चौकशी करत आहे आणि 15 दिवसांच्या आत अहवाल सोपविणार आहे. दोन वर्षांपूर्वी भूमी खरेदीवरून निर्माण झालेल्या वादानंतर पारदर्शकता बाळगण्याचा इशारा देण्यात आला होता, परंतु आता समोर आलेले मुद्दे अधिक गंभीर आहेत, असे मिश्र यांनी म्हटले आहे.

Comments are closed.