सह्याद्री मल्टिसिटी फसवणूक प्रकरणी, चेअरमनसह दोघांना अटक

सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या फसवणूकप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात (वय 35, रा. सावेडी, अहिल्यानगर) व दरेवाडी शाखेचा मॅनेजर दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय 35, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना दि. 19 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या चेअरमनसह 13 व्यक्तींनी मिळून 18 जणांची सुमारे 66 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत प्रमोद राजेंद्र साठे (वय 41, रा. नारायणडोह, ता. अहिल्यानगर) यांनी 9 जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख तपास करीत आहेत. पोलिसांनी या गुह्यात आतापर्यंत 160 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले असून, फसवणुकीचा आकडा 3 कोटी 83 लाख 55 हजार 496 रुपयांवर गेला आहे. चेअरमन थोरात व मॅनेजर कोरडे यांना शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल गुह्यात यापूर्वी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) ताब्यात घेत अटक केली.

160 जणांचे 3.83 कोटी अडकले

भिंगार ठाण्यात 9 जूनला फिर्याद दाखल झाली, तेव्हा 18 व्यक्तींची 66 लाख रुपये फसवणूक झाल्याचा उल्लेख होता. मात्र, हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी 160 गुंतवणूकदारांचे जबाब नोंदवून घेतले. यामुळे फसवणुकीची रक्कम वाढली असून, ती 3 कोटी 83 लाख 55 हजार 496 रुपये झाली आहे.

Comments are closed.