Chal Halla Bol movie controversy Censor Board on namdeo dhasal poems


मुंबई : मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) कात्रीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांनी नामदेव ढसाळांच्या या सिनेमातील ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो…’ या कवितेवर आक्षेप घेतला. एवढेच नाही तर, ‘कोण नामदेव ढसाळ?’ असा उर्मट प्रश्न विचारत सिनेमातील त्यांची कविता न वगळल्यास सिनेमाच्या प्रदर्शनास परवानगी नाकारली आहे. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमात एकूण 11 कट सुचवले आहेत. (Chal Halla Bol movie controversy Censor Board on namdeo dhasal poems)

हेही वाचा : Congress : पुन्हा सत्तेत येणे अवघडच, कॉंग्रेसच्या भविष्याबाबत काय म्हणाले शशी थरुर 

परिणामी लोकांचा सिनेमा या चळवळीच्या माध्यमातून लोकवर्गणीतून सिनेमा बनवणारे लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सिनेमाचे निर्माते आणि काही सामाजिक संघटनांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. ‘चल हल्ला बोल’ सिनेमा 1 जुलै 2024 रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डाकडे सबमिट करण्यात आला होता. पण, सिनेमातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांनी मांडले. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यावर कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही, असे उत्तर या अधिकार्‍यांनी दिले. एवढेच नाही तर या कविता सिनेमातून वगळाव्यात, असे सेन्सॉर बोर्डाने लेखी कळवले आहे.

“या सिनेमाच्या माध्यमातून दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, शेतकरी, अल्पसंख्याक, मुस्लीम, स्त्रीया इत्यादींच्या शोषणाविरुद्धचा लढा दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. पण, सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारल्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. हा सिनेमा रिवायजिंग कमिटीकडे पाठवत त्याची रीतसर फीदेखील भरण्यात आली. तरीही सेन्सॉर बोर्डाच्या कोणत्याच अधिकार्‍याकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नाही.” असे म्हणत सिनेमाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, “सेन्सॉर बोर्डावर बसणारे जे महाभाग आहेत त्यांना नामदेव ढसाळ माहिती नसतील. तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तुम्ही तातडीने राजीनामा देणे योग्य राहील.” अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली.



Source link

Comments are closed.