ये सफर बहोत कठीण मगर.. रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर हिंदुस्थानसमोर आव्हानांची मालिका असल्याची गंभीर कबुली

रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर हिंदुस्थानी संघासाठी ‘ये सफर बहोत कठीण’ असल्याची कबुली खुद्द प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिली आहे. दोघांनी एकाचवेळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांची ही अनुपस्थिती संघासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल. मात्र यादरम्यान नवोदित खेळाडूंना पुढाकार घेत जबाबदारी घेण्याची संधी मिळणार आहे, अशी भावनाही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी व्यक्त केली.

हिंदुस्थानचा संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वीच गेल्या काही दिवसांत रोहित आणि विराटने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.

या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी गंभीरने संघाची बाजू मांडली. कुणी कधी खेळायला सुरुवात करायची आणि कधी खेळ थांबवायचा हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रशिक्षक असो, निवड समिती सदस्य असो किंवा देशातील इतर कोणीही असो, कधी निवृत्ती घ्यावी आणि कधी घेऊ नये हे सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही. रोहित, विराटच्या जाण्यामुळे हिंदुस्थानला एका नवीन कसोटी कर्णधाराचीही आवश्यकता असेल. त्यांची जागा घेणे सोपे होणार नाही. रोहित, विराटची अनुपस्थिती ही प्रखरतेने जाणावणार. पुढचा प्रवासही खडतर असेल, पण संघात असे युवा खेळाडू आहेत जे जबाबदारी घेण्यास तयार होतील. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधीही जसप्रीत बुमरा नसतानाही मी हेच सांगितले होते. कोणाचीही अनुपस्थिती दुसऱ्या खेळाडूला काहीतरी खास करण्याची संधी देते. आशा आहे की, असे खेळाडू असतील जे या संधीची वाट पाहत असतील.

विराट आणि रोहित 2027 च्या एकदिवसीय विश्वचषक संघात असतील का असे विचारले असता गंभीर म्हणाला, त्यासाठी अजूनही बराच वेळ आहे. त्याआधी टी-20 विश्वचषक व्हायला हवा. ही एक मोठी स्पर्धा आहे जी फेब्रुवारी-मार्चमध्ये हिंदुस्थानात होणार आहे. सध्या आमचे संपूर्ण लक्ष त्यावर असल्याचे सांगत त्या प्रश्नाला बगल दिली.

Comments are closed.